

मुंबई: रेशन कार्डवर नाव नोंदवले म्हणजे ती व्यक्ती त्या कुटुंबातील नातेवाईक होत नाही. त्या नावाच्या आधारे भाडेकरू असल्याचा दावा करता येणार नाही किंवा कोणताही कायदेशीर अधिकार सांगता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई सत्र व दिवाणी न्यायालयाने एका प्रकरणात दिला. दादरच्या हिंदू काॅलनीतील फ्लॅटमध्ये बेकायदेशीर ताबा मिळवणाऱ्या व्यक्तीच्या हकालपट्टीचे आदेश देताना न्यायालयाने हा निर्वाळा दिला.
दादर हिंदू कॉलनीतील ५०० चौरस फुटांच्या फ्लॅटवर गेल्या १० वर्षांहून अधिक काळ बेकायदेशीरपणे ताबा मिळवून बसलेल्या व्यक्तीला तात्काळ बाहेर काढण्याचे आदेश दिवाणी न्यायाधीश ए. एच. बेग यांनी दिला.
प्रतिवादी मधुकर कदम हे कायदेशीर वारस नसून केवळ एक अतिक्रमणदार आहेत. मूळ भाडेकरू कै. मीरा तेंडुलकर यांच्याशी आपले कौटुंबिक नाते असल्याचा दावा कदम यांनी केला होता. ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी रेशनकार्डवरील नावाचा संदर्भ दिला होता.
त्याआधारे कदम यांनी केलेला दावा न्यायालयाने फेटाळून लावला. कदम यांना तेंडुलकर यांच्या कुटुंबाविषयीची प्राथमिक माहिती तसेच गोत्र सांगता आले नाही. तसेच दोघांच्या जातीही वेगवेगळ्या असल्याचे न्यायालयात समोर आले.
दादर हिंदू कॉलनीतील खरेघाट रोडवरील इमारतीचे अमेरिकेत राहणारे मालक हेमंत आणि विनीत सरदार यांनी २०१३ मध्ये हा खटला दाखल केला होता. 'मंगेश महालक्ष्मी' इमारतीमधील तळमजल्यावरील फ्लॅट कै. मीरा तेंडुलकर यांच्या नावावर भाड्याने होता.
नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांच्या निधनानंतर मधुकर कदम तिथे बेकायदेशीरपणे राहत होते. कदम आणि त्यांचे दिवंगत वडील हे मीरा तेंडुलकर यांच्याकडे घरगुती मदतनीस म्हणून काम करत होते आणि केवळ सहानुभूतीपोटी त्यांना तिथे राहू दिले होते, असा युक्तिवाद घरमालकांच्या वतीने करण्यात आला. त्याचा स्विकार न्यायालयाने केला.