मुंबई : तळोजा आणि अंबरनाथ येथील डम्पिंगचा पेच कायम राहिल्याने मुंबईकरांचा कचरा आपल्या उदरात घेणाऱ्या देवनारच्या कचराभूमीची क्षमताही संपली आहे. नुकत्याच झालेल्या पाहणी अहवालात या डम्पिंगवर तब्बल 185 लाख मेट्रिक टन कचऱ्याचा ढीग जमा झाले आहेत. याची उंची 8 ते 40 मीटरपर्यंत पोहचली आहे.
1927 पासून देवनार डम्पिंग ग्राउंडवर मुंबईचा कचरा टकला जात आहे. 120 हेक्टर इतक्या क्षेत्रफळात पसरलेल्या या डम्पिंगवर दररोज 5,900 मेट्रिक टन कचरा टाकला जात असून आतापर्यंत 185 लाख मेट्रिक टन घनकचरा साठला आहे.
हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु मुंबईत जमवणाऱ्या कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे येथेच कचरा टाकला जात आहे. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी आता स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. महापालिकेने शास्त्रोक्त पद्धतीने टप्प्याटप्प्याने हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडच्या धर्तीवर बायोरिक्टर व कंपोस्ट तंत्रज्ञान वापरून कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे.
देवनार डम्पिंग ग्राउंड येथे दररोज येणारा कचरा घेण्यासाठी आवश्यक असलेली तात्पुरती 50 एकर जमीन वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत मुंबई महानगरपालिकेकडे राखून ठेवली आहे. दरम्यान अंबरनाथ येथील जागा महापालिकेच्या ताब्यात मिळाली आहे. मात्र तेथे कचरा विल्हेवाटीबाबत काही निर्णय झालेला नाही. तळोजातील जागेचा प्रश्नही स्थानिकांच्या विरोधामुळे रखडला आहे. त्यामुळे मुंबईचा कचरा टाकायचा तरी कुठे, असा प्रश्न पालिकेसमोर आहे.
110 हेक्टर जमीन पुनर्प्राप्त करणार
देवनार डम्पिंग ग्राउंडवर साठलेला 185 लाख टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केल्यानंतर सुमारे 110 हेक्टर जमीन मोकळी होणार आहे. त्यामुळे ही पूर्ण जमीन महापालिकेच्या ताब्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले