वायकरांच्या मेहुण्यामुळे ‘ईव्हीएम’चा संशयकल्लोळ

वायकरांच्या मेहुण्यामुळे ‘ईव्हीएम’चा संशयकल्लोळ

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडिलकर यांच्याकडे ईव्हीएम अनलॉक करण्याचा ओटीपी असणारा मोबाईल सापडल्याचा आरोप झाल्याने एकच संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. या मतदारसंघातून रवींद्र वायकर केवळ 48 मतांनी निवडून आले होते. दुसरीकडे ईव्हीएम उघडण्यासाठी कोणताही मोबाईल अथवा त्यावरील ओटीपी वापरला जात नाही, मंगेश पंडिलकर आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरुद्ध मतमोजणी केेंद्रावर मोबाईल घेऊन गेल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुरव यांना निलंबित करण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन दिले.

ईव्हीएम ही एक स्वतंत्र प्रणाली असलेली यंत्रणा असून ती कोणत्याही मोबाईल किंवा अन्य कुठल्याच नेटवर्कला जोडलेली नसते, असा स्पष्ट खुलासा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी केला.

जो मोबाईल ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी वापरला जातो, ज्यावर ओटीपी येतो तोच मोबाईल वायकरांच्या प्रतिनिधीने वापरल्याच्या बातम्या रविवारी काही माध्यमांनी प्रकाशित केल्या. त्यावर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत खुलासा केला. ईव्हीएम मशीन स्वतंत्र यंत्रणा असून त्यासाठी कोणताही मोबाईल अथवा ओटीपी वापरला जात नाही. ईव्हीएम मशीन किंवा मतमोजणीशी मोबाईलचा कसलाच संबंध नसल्याचे सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

मतमोजणी केंद्रावर निवडणुक संबंधी डाटा एन्ट्रीसाठी इनकोअर ही प्रणाली वापरली जाते. या प्रणालीत माहिती भरण्यासाठी काही अधिकार्‍यांना मोबाईल वापरण्याची परवानगी दिली जाते. जोगेश्वरीत दिनेश गुरव हा डाटा एन्ट्रीचे काम करणार्‍या अधिकार्‍याचा फोन रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांनी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुरव यांना निलंबित करण्यात आले असून पंडिलकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र, मतमोजणीशी या मोबाईलचा अर्थाअर्थी संबंध नाही. विनापरवाना मोबाईल वापरल्याची घटना घडली. त्यावर निकालाच्या दुसर्‍याच दिवशी पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार 11 तारखेला पोलिसांनी गुन्हाही दाखल केल्याचे सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मतदान केंद्रावरील सीसीटीव्हीचे चित्रण देण्याची मागणीही पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यासह ठाकरे गटाकडून केली जात आहे. निवडणूक नियमावलीनुसार निकालानंतर ईव्हीएम मशीनसह सीसीटीव्ही फुटेजही स्ट्राँग रूममध्ये ठेवले जातात. उच्च न्यायालयाच्या आदेशाशिवाय हे फुटेज कोणाला देता येत नाहीत. अगदी प्रशासनाला देखील या बाबी न्यायालयाच्या निर्देशाशिवाय पाहता येणार नसल्याचे सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

किर्तीकरांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव

ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅटच्या तांत्रिक तपासणीची मागणी केली आहे. ईव्हीएम बनविणाऱ्या कंपनीच्या अभियंत्यांकडून इव्हीएम मशीनमधील मेमरीची तपासणी आणि पडताळणी करावी. आमच्या उपस्थित ही पडताळणी करावी तसेच इव्हीएम मध्ये जिथे चिन्हावर मतांची नोंद केली जाते त्या माइक्रोप्रोसेसरची माहिती द्यावी. तसेच, यासंदर्भातील तांत्रिक बाबींच्या मार्गदर्शक सूचनांचीही माहिती देण्याची मागणी अमोल कीर्तिकरांनी केन्द्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निकालात याबाबतीत दिशानिर्देश दिल्याचे कीर्तिकरांनी आयोगाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यास नकार दिला आहे.

खा. प्रियांका चतुर्वेदी यांनी आयोगावरच प्रश्नांची सरबत्ती केली. अमोल कीर्तिकर यांनी विचारल्याप्रमाणे ते मतमोजणीच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करतील का? फुटेज देण्यास नकार देणार्‍या उपनगर जिल्हाधिकार्‍यांकडून ते उत्तरदायित्व मागतील का? वायकर यांच्या विजयाचा निवडणूक निकाल रोखणार का? एकदा मतमोजणी कशी झाली आणि रिटर्निंग ऑफिसरने मतांची फेरमोजणी कशी जाहीर केली हे ते स्पष्ट करतील का? असे अनेक सवाल त्यांनी केले.

19 व्या फेरीनंतर प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या मतांची घोषणा का थांबवली गेली हे स्पष्ट करण्याची मागणीही त्यांनी केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्त्या वंदना चव्हाण यांनी मंगेश पंडिलकरला ताबडतोब अटक झालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे.

हा कीर्तिकरांचा रडीचा डाव : वायकर

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने तो अमोल कीर्तिकर यांना पचविणे अवघड झाले आहे. त्यामुळे ते रडीचा डाव खेळत आहेत. आपला विजय हा सत्याचा विजय असून कीर्तिकर यांनी जे काही करायचे ते करावे, असे आव्हान शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी दिले आहे.

ते म्हणाले की, एक हजार पोलिस, 20 उमेदवारांचे प्रतिनिधी आणि सर्व उमेदवार मतमोजणी केंद्रामध्ये होते. मग रवींद्र वायकर आतमध्ये जाऊन काहीतरी वेगळे कसे करू शकतो, असा सवाल त्यांनी केला.

पंडिलकर, गुरवला नोटीस

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामप्यारे राजभर म्हणाले की, आम्ही मंगेश पंडिलकर ज्या फोनवर बोलत होता, तो फोन तपासणीसाठी पाठवला आहे. या फोनमधील कॉल रेकॉर्डस्ची तपासणी केली जाईल. या मोबाईल फोनचा वापर अन्य कोणत्या कारणासाठी झाला का, हेही पाहिले जाईल. आम्ही इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून मंगेश पंडिलकर आणि दिनेश गुरव यांना नोटीस पाठवली असून त्यांची चौकशी होईल. त्यांनी सहकार्य न केल्यास दोघांविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल.

अमोल कीर्तिकरांच्या मागण्या

ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी ईव्हीएममधील मतांची फेरमतमोजणी करण्याची मागणी निकालाच्या दिवशी केली होती. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर विहित वेळेत ही मागणी केली नसल्याचे सांगत ही मागणी त्याच दिवशी फेटाळण्यात आली; तसेच अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीच्या दिवशीचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज मिळावे अशीही मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news