Sushilkumar Shinde | सावरकरांबद्दल संकुचित विचार हे आमच्यासमोरचे आव्हान

ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा काँग्रेसश्रेष्ठींना घरचा आहेर
Sushilkumar Shinde
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे ‘फाईव्ह डिकेडस् इन पॉलिटिक्स’ हे आत्मचरित्र file photo
Published on
Updated on

मुंबई : ऊठसूट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वावर घसरण्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात तीव्र आक्षेप घेतला असून, सावरकरांबद्दलचे संकुचित विचार हे आमच्यासमोरचे आव्हान असल्याचे सांगत काँग्रेसश्रेष्ठींना घरचा अहेर दिला आहे. सुशीलकुमार शिंदेंची ही सावरकर समर्थक भूमिका काँग्रेसच्या आतापर्यंतच्या भूमिकेशी, विचारांशी फारकत घेणारी आहेच, त्याहीपेक्षा ती थेट राहुल गांधी यांच्या सावरकर विरोधाला छेद देणारीही असल्याने ती आता चर्चेचा विषय झाली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेस नेते आणि त्यातही खासकरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी सतत हल्ले चढवत आले आहेत. स्वातंत्र्यवीर नव्हे माफीवीर, अशी संभावनाही राहुल गांधींनी आपल्या भारत जोडो यात्रेत केल्याने मोठाच गदारोळ झाला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे निष्ठावंत नेते असलेले आणि प्रदीर्घ व विविध पदांवरची वैभवशाली राजकीय कारकीर्द नावावर असलेले सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या नेत्याने सावरकरांची बाजू घेत सावरकरविरोधी विचारांना संकुचित ठरवल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.

गेल्या 10 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते ‘फाईव्ह डिकेडस् इन पॉलिटिक्स’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांनी शब्दांकन केलेल्या या अवघ्या 200 पानी पुस्तकात सुशीलकुमार शिंदे यांनी आठ विभागांमध्ये आपला राजकीय जीवनपट मांडताना सावरकरांबद्दलची आपली भूमिका मोजक्या ओळींमध्ये मांडली. पुस्तक प्रकाशन होऊन पंधरा दिवस उलटल्यानंतर मात्र सुशीलकुमारांनी केलेली सावरकर स्तुती आणि सावरकर विरोधकांची निंदा हा आता चर्चेचा विषय झाला आहे.

‘सावरकरांबद्दलची भूमिका’ असे उपशीर्षक देत सुशीलकुमार म्हणतात, 25 मे 1983 रोजी नागपुरात वीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मी होतो. जातिव्यवस्था आणि अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यात सावरकरांनी दिलेले योगदान याबद्दल मला व्यक्तिश: आदर असल्याने मी या कार्यक्रमात सहभागी झालो. तत्कालीन रा. स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस व्यासपीठावर होते. दुसर्‍या दिवशी या कार्यक्रमाच्या बातम्या फोटोसह झळकल्या. फोटोमध्ये देवरस हे खुर्चीवर बसलेले, तर आम्ही बाकी सारेजण चटईवर खाली बसलेलो. हे छायाचित्र पाहून काँग्रेसच्या एका खासदाराने तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले की, सरसंघचालकांच्या पायाशी बसणार्‍या आणि सावरकरांना प्रणाम करणार्‍या लोकांची निष्ठा तपासण्याची वेळ आली आहे.

देवरस यांना मधुमेह होता आणि आर्थ्रायटिसनेही ते त्रासलेले होते. त्यांनीच खुर्चीवर बसण्याची परवानगी आमच्याकडे मागितली, असा खुलासा मी या बातमीवर केला. सुशीलकुमार सांगतात, या वादात मी सावरकरांना समर्थन देण्याच्या भूमिकेवर मात्र ठाम राहिलो. जातिअंताच्या लढाईत सावरकरांनी दिलेले योगदान व केलेल्या प्रयत्नांबद्दल मला नितांत आदर आहे. मी स्वत: मागासवर्गातून आलेलो असल्याने त्यांचे जातीअंताचे प्रयत्न माझ्यासाठी विशेष ठरतात.

हा कार्यक्रमाचा वाद मिटला. मात्र, मी त्यानिमित्ताने माझी भूमिका मांडली. जेव्हा जेव्हा सावरकरांचा विषय येतो, तेव्हा तेव्हा आम्ही हटकून त्यांच्या हिंदुत्वावरच का घसरतो, असा मला प्रश्न पडतो. खरे तर सावरकरांच्या व्यक्तित्त्वाला एक ना अनेक पैलू होते. आम्ही त्यांच्यातील विचारवंत, त्यांच्यातील प्रखर वैज्ञानिक का बघत नाही. सामाजिक समतेच्या लढाईत आणि दलितांच्या उद्धाराच्या चळवळीत सावरकरांनी स्वत: मोठी किंमत मोजली. त्यांच्या विचारांबद्दलचा संकुचितपणा हे आमच्यासमोरचे एक आव्हानच आहे, असे सुशीलकुमारांनी स्पष्ट शब्दांत नोंदवले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news