

मुंबई : मेंदूच्या खालच्या भागात अडकलेली गोळी अत्याधुनिक नेव्हिगेशन तंत्रज्ञानाद्वारे काढण्यात जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.
पठाणवाडी, संजय नगर येथील ५१ वर्षीय अबुताल्हा अव्वल बैग यांना २८ सप्टेंबर रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास गोळी लागल्याने जे. जे. रुग्णालयात आणण्यात आले. रूग्णालयात आल्यानंतर सीटी स्कॅन व डीएसए तपासणी करण्यात आली. या आलेल्या अहवालानुसार, गोळीने ऑक्सिपिटल मास्टॉइड हाड, डाव्या कॅरोटिड कॅनाल आणि डाव्या मॅक्सिलाच्या मागच्या वरच्या भागाचे नुकसान करून डाव्या मागच्या खालच्या मॅक्सिलाच्या भिंतीमध्ये अडकलेली होती. हा मेंदू जवळील अत्यंत गुंतागुंतीची व संवेदनशील भाग होता. शस्त्रक्रियाही अत्यंत गुंतागुतीची असल्याने अत्याधुनिक फ्रेमलेस नेव्हिगेशन तंत्रज्ञान वापरुन एंडोस्कोपिक पद्धतीने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
या शस्त्रक्रियेत कान नाक घसा विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण, ईएनटी विभाग सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनिता बागे, मेंदू शस्त्रक्रिया विभाग सहायक प्राध्यापक डॉ. कमलेश कांगारी सहभागी झाले होते. मेंदू शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. व्हर्नन व्हेल्हो, भूलतज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ. उषा बडोळे, प्राध्यापक भूल विभागसहयोगी प्राध्यापक, डॉ. प्रेरणा जोगदंड यांचे सहकार्य मिळाले.