

मुंबई : जे जे रुग्णालयातील रुग्णांना अत्याधुनिक, वातानुकूलित वॉर्डमध्ये उपचार मिळावेत, या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) आठ जनरल वॉर्डचे खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर रुपांतर केले. मात्र कोट्यवधींचा खर्च करूनही विजेची अतिरिक्त क्षमता उपलब्ध नसल्याने हे वॉर्ड अद्याप एसीविरहितच आहेत.
शासकीय रुग्णालयांतील अपुर्या सुविधांमुळे अनेकदा रुग्णांना जमिनीवर उपचार घ्यावे लागतात. या पार्श्वभूमीवर जे जे रुग्णालयातील वॉर्डांचा कायापालट करण्यात आला. मेडिसिन, शस्त्रक्रिया, न्यूरोलॉजी, हृदयरोग, ईएनटी, बालरोग शस्त्रक्रिया आणि सीव्हीटीएस विभागातील दोन वॉर्ड अशा एकूण आठ वॉर्डांचे नुतनीकरण पूर्ण झाले आहे, तर आणखी दोन वॉर्डांचे काम सुरू आहे. एका वॉर्डाच्या नुतनीकरणासाठी साडेपाच ते सहा कोटी रुपये खर्च झाले असून, रुग्णांना खासगी रुग्णालयासारखी सुविधा मिळेल, अशी अपेक्षा होती.
पूर्वी या आठ वॉर्डांची बेड क्षमता 282 इतकी होती. पीडब्ल्यूडीने रचना बदलून आता 389 खाटा उपलब्ध केल्या असून 107 अतिरिक्त खाटांचा समावेश झाला आहे. यामुळे रुग्णांना जमिनीवर उपचार घ्यावे लागण्याची वेळ काहीअंशी टळणार आहे. मात्र विजेच्या अधिक क्षमतेसाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर बसविल्याशिवाय एसी सुरु होणार नाहीत. त्यामुळे एसी सुरू न करता केवळ फॅनच्या हवेवर समाधान मानावे लागत आहे.
रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील सर्व वॉर्ड पुढील काही वर्षांत वातानुकूलित स्वरूपात बदलले जाणार आहेत. दरवर्षी आठ ते दहा वॉर्डांचे रूपांतर टप्प्याटप्प्याने केले जाईल, जेणेकरून उपचार व्यवस्थेत अडथळा येणार नाही, असे वैद्यकीय शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
जे जे रुग्णालयातील आठ वॉर्डांचे नुतनीकरण झाले आहे, पण सध्या एसी सुरु नाहीत. अतिरिक्त क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरसाठी संबंधित यंत्रणेला कळवले असून येत्या काही दिवसांत वातानुकूलित यंत्रणा सुरू होईल.
डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, जे जे रुग्णालय