

मुंबई: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड कायदेशीर असल्याचा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला. पदाधिकारी सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटिशीत कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
वरळी येथील अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड ही बेकायदेशीर असल्याचा दावा सच्चिदानंद सिंह यांनी केला होता. आपल्या वकिलांमार्फत त्यांनी नोटीस पाठविली होती. त्यावर मंगळवारी तटकरे यांनी त्यांच्या नोटिशीला कायदेशीर सल्ला घेऊनच योग्य ते उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला.
कुणीतरी एखादी व्यक्ती पत्र किंवा नोटीस पाठवते, याचा अर्थ पक्षात असंतोष आहे असा होत नाही. एखादी व्यक्ती खोडसाळ प्रकार करत असल्यास कोअर कमिटीच्या बैठकीत संबंधितांवर पक्षशिस्तभंग किंवा अन्य कारवाईचा विचार केला जाईल, असे तटकरे म्हणाले.
अर्थ खाते पुन्हा मिळावे
अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आमच्या पक्षाला ते पुन्हा मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहोत, असेही तटकरे म्हणाले.