

Chhagan Bhujbal Maharashtra Deputy Chief Minister oath statement
मुंबई : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आता चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. ‘‘अजितदादा गेले, हे वास्तव पचवणे कठीण आहे. पण 'शो मस्ट गो ऑन' या उक्तीप्रमाणे आता कोणाकडे तरी जबाबदारी सोपवावीच लागेल,’’ असे भावूक आणि स्पष्ट विधान ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. विशेष म्हणजे, उद्याच नव्या नेत्याची निवड होऊन शपथविधीही पार पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची आणि विधानपरिषद सदस्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधीमंडळ पक्षनेतेपदावर शिक्कामोर्तब केले जाईल. भुजबळ म्हणाले की, ‘‘अजितदादांकडे असलेले विधीमंडळ पक्षप्रमुख पद कोणाकडे द्यायचे, याचा निर्णय उद्याच्या बैठकीत होईल. जर सर्वांचे एकमत झाले, तर उद्याच्या उद्याच शपथविधी सोहळाही पार पडू शकतो.’’
सध्या राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या चर्चेला भुजबळांनी अधिक बळ दिले आहे. ते म्हणाले की, ‘‘सुनेत्रा पवार यांच्याकडे हे पद द्यावे, अशी अनेकांची मागणी आहे. बातम्यांमधूनही तेच समोर आले आहे. मला स्वतःला ही मागणी अजिबात चुकीची वाटत नाही. उपमुख्यमंत्री पदाची रिक्त जागा सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून तातडीने कशी भरता येईल, याकडेच आमचे सध्या प्रमुख लक्ष आहे,’’ असे सूचक विधान भुजबळांनी केले.
अजितदादांच्या जाण्याने वैयक्तिकरीत्या प्रचंड धक्का बसल्याचे मान्य करत भुजबळ म्हणाले की, ‘‘त्या दुदैवी घटनेनंतर झोप उडाली आहे. परंतु सरकार आणि पक्ष थांबवून चालणार नाही. कोणाला तरी जबाबदारी घ्यावीच लागेल.’’ मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला असून, उद्याची बैठक ही राज्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे.