

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र अद्याप धक्क्यातून सावरलेला नाही. राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निर्माण झालेली ही मोठी पोकळी भरून काढण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीचे घटक पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट केली.
अजितदादांच्या पश्चात उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेते पद रिक्त झाले आहे. या जागेवर कोणाची नियुक्ती करायची, याबाबत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ‘अजितदादांचे योगदान पक्षासाठी अमूल्य होते. ही जागा तातडीने भरणे गरजेचे आहे. पक्षाचे नेते आणि सर्व आमदार सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा आदर करूनच योग्य निर्णय घेऊ. जनभावना आणि आमदारांची मते विचारात घेऊनच आमचा पुढील नेता निवडला जाईल.’
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत विचारले असता पटेल म्हणाले, ‘आज आम्ही नावांची कोणतीही अधिकृत चर्चा केलेली नाही. हा आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. सुनेत्रा वहिनींच्या नावाला विरोध होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करावी लागेल.’
‘आज अजित पवार यांना आपल्यातून जाऊन तीन दिवस झाले आहेत. त्यांच्या घरी सांत्वनासाठी येणाऱ्यांची गर्दी आहे. अशा दु:खद प्रसंगी राजकीय चर्चा करणे योग्य नाही. तरीही, प्रशासकीय आणि राजकीय गरजा पाहता आम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आम्ही सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार आणि जय पवार यांची भेट घेऊ. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णयाची घोषणा केली जाईल,’ असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्याची प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच पूर्ण करणार आहे. या प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना अवगत करण्यात आले असून, महायुतीमधील समन्वय कायम राखत हा निर्णय घेतला जाईल, असे संकेत पटेल यांनी दिले आहेत.
दरम्यान, अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीची धुरा कोणाच्या खांद्यावर जाणार? सुनेत्रा वहिनी राजकारणात सक्रिय होणार का? या प्रश्नांची उत्तरे येत्या २४ तासांत मिळण्याची शक्यता आहे.