

मुंबई : मुंबईचा बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या दक्षिण भागाचे उद्घाटन होऊन काही महिनेच झाले असताना, त्याच्या दुरावस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एक जागरूक मुंबईकर, कपिल शर्मा शोमधील कॉमेडियन अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिने सोशल मीडियावर या रस्त्यावरील समस्या मांडत थेट मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करून जाब विचारला आहे.
कॉमेडियन अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती यांनी सोशल मीडिया इंन्स्टा स्टोरीवरून केलेल्या तक्रारीनुसार, कोस्टल रोडवर नुकतेच काही खड्डे पडले होते. हे खड्डे भरण्यात आले असले, तरी ते काम व्यवस्थित झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावर उंच-सखल भाग तयार झाला असून, प्रवासासाठी तो धोकादायक ठरत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बनवलेल्या या रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जावर यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.
कोस्टल रोडच्या निर्मितीवेळी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून 'ग्रीन बेल्ट' तयार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तक्रारीनुसार यातील बहुतांश झाडे आणि रोपे पाण्याअभावी सुकू लागली आहेत किंवा मृत झाली आहेत. यावर टीका करताना संबंधित नागरिकाने म्हटले आहे, "या झाडांना जगवण्यासाठी पाणी देण्याची गरज आहे. मुंबई महानगरपालिका काय केवळ बेभरवशाच्या पावसावर अवलंबून आहे का?" या प्रश्नामुळे प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर शंका उपस्थित होत आहे.
याशिवाय, कोस्टल रोडवरील दिशादर्शक फलकांवरूनही (Signages) गोंधळ निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या फलकांवर व्यक्तींची नावे वापरल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. अपघात टाळण्यासाठी आणि सोयीसाठी या नावांच्या जागी 'वरळी' आणि 'ताडदेव' यांसारख्या ठिकाणांची स्पष्ट नावे लिहावीत, अशी मागणी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती यांच्याकडून करण्यात आली आहे.
एकीकडे मुंबईकरांना दिलासा देणारा हा प्रकल्प सुरू झाला असला, तरी दुसरीकडे इतक्या कमी वेळात समोर आलेल्या या समस्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. आता अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती यांच्या तक्रारींची दखल घेऊन मुंबई महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणा काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.