हिजाबबंदीविरोधात विद्यार्थिनी हायकोर्टात

हिजाबबंदीविरोधात विद्यार्थिनी हायकोर्टात

मुंबई : पुढारी वार्ताहर : 
यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच चेंबूरच्या आचार्य मराठे महाविद्यालयात हिजाबबंदीमुळे वाद निर्माण झाला आहे. या हिजाबबंदीच्या विरोधात नऊ विद्यार्थिनीनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मागील वर्षांपासून महाविद्यालयात सुरू असलेल्या हिजाबबंदीच्या वादावर पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

मागील वर्षी आचार्य मराठे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ड्रेस कोड दिला होता. महाविद्यालयाने निश्चित केलेला गणवेश परिधान करूनच विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जात होता. याबाबत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेपूर्वी लेखी सूचना दिल्या होत्या. प्रवेश अर्ज भरताना या अटी त्यामध्ये नमूद करण्यात आल्या होत्या. बुरखा, हिजाब, टोपी, बॅच, स्टॉल यासह कोणत्याही प्रकारची धार्मिक वस्त्र वर्गात घालून येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. यानंतर हिजाब घातलेल्या काही विद्यार्थिनींना महाविद्यालयामध्ये प्रवेश नाकारल्यानंतर व्यवस्थापन व विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये वाद निर्माण झाला होता. विद्यार्थी व पालकांनी कॉलेजच्या प्रवेशद्वारावर आंदोलनेदेखील केले होते. मात्र महाविद्यालय प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम होते.

बुरखा घालून आलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश द्यावा, त्यांना गणवेश परिधान करण्यासाठी एक स्वतंत्र वर्ग द्यावा, अशी मागणी संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनी महाविद्यालय व्यवस्थापनाकडे केली. महाविद्यालय व्यवस्थापन विद्यार्थिनींच्या बाथरूममध्ये बुरखा बदली करण्यासाठी परवानगी देण्यास अनुकूल होते.

मागील वर्षी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निळ्या रंगाची फुल पॅन्ट व पिवळ्या रंगाचे हाफ शर्ट तर विद्यार्थीनींसाठी सलवार कमीज त्यावर निळ्या रंगाचे जॅकेट असा गणवेश ठरवून दिला होता. यावर्षीपासून पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देखील ड्रेस कोड देण्यात आला आहे. मागील वर्षांप्रमाणे याहीवर्षी कॉलेजच्या व्यवस्थापनाने बुरखा, हिजाब घालण्यास बंदी घातली आहे. त्याबाबतच्या सूचना प्रवेश अर्ज भरताना त्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्याने पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news