

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात असलेली सुस्ती आज अखेर संपली असून, गुंतवणूकदारांसाठी गुरुवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि देशांतर्गत जोरदार खरेदीमुळे सर्वत्र तेजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अलीकडील तीन दिवसांतील घसरणीनंतर बाजारात व्यापकस्तरावर खरेदीचा ओघ वाढल्याने सेन्सेक्स सुमारे 75,398.72 अंकांवर पोहोचला आणि जवळपास 789.74 अंकांची वाढ नोंदवली. तर, निफ्टी 277 अंकांनी वाढून 23,689.60 वर स्थिरावला. व्यापकस्तरावर विविध क्षेत्रांमध्ये खरेदी वाढल्याने निफ्टीने पुन्हा 23,650 चा महत्त्वाचा टप्पा पार केला. दिवसातील व्यवहारादरम्यान निर्देशांकाने 75,600 चा टप्पाही पार केला, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा सकारात्मक द़ृष्टिकोन आणि बाजारातील मजबूत परताव्याचे संकेत दिसून आले.
या तेजीमध्ये बँकिंग, वित्तीय सेवा, फार्मा, मेटल आणि निवडक हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्सनी आघाडी घेतली, तर व्यापक बाजारानेही सकारात्मक सहभाग नोंदवला. अलीकडील विक्रीनंतर कमी स्तरांवर गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे बाजारात पुनरुज्जीवन दिसून आले. अमेरिका आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या शिखर परिषदेत सकारात्मक घडामोडी घडल्याने जागतिक बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी वॉशिंग्टनसोबतच्या व्यापार चर्चेत प्रगती होत असल्याचे सांगितल्यानंतर आशियाई आणि युरोपीय बाजारांमध्येही वाढ नोंदवली गेली.
दरम्यान, प्रमुख ब्ल्यू-चिप निर्देशांकांनी याआधीच्या सत्रात सुमारे 0.1 टक्क्याची वाढ नोंदवली होती. यापूर्वी सलग चार सत्रांमध्ये बाजारात जवळपास 4 टक्क्यांची घसरण झाली होती. रुपयातील घसरण, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला होता. मात्र, जागतिकस्तरावरील सकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढताना दिसत आहे.
गुंतवणूकदारांची चांदी
सकाळच्या घसरणीनंतर, दुपारी किरकोळ सुधारणा पाहायला मिळाली. त्यामुळे या आठवड्यातील गेल्या तीन दिवसांचे नुकसान भरून काढणारी बाजारातील ही दुसरी सलग तेजी गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक ठरली आहे. शेअर बाजारात सुधारणा होत असल्याने, जोपर्यंत दोन्ही निर्देशांक महत्त्वाच्या पातळीवर टिकून राहतील, तोपर्यंत ही तेजी कायम राहील, असा अंदाज आहे.
सोने : 382 रुपयांची वाढ
गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 382 रुपयांनी वाढून 1.61 लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर, 1 किलो चांदीचा भाव आज 370 रुपयांनी घसरून 2.87 लाख रुपयांवर आला आहे.