

मुंबई/नागपूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन पाच दिवस आणि राज्यातील सरकारचा शपथविधी होऊन पंधरा दिवस झाल्यानंतर अद्याप खातेवाटप झाले नसल्याने खातेवाटप होणार तरी कधी, असा प्रश्न राजकीय व प्रशासकीय वर्तुळात विचारला जात आहे.
राज्यातील महायुती सरकारमध्ये ५ डिसेंबरला मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर १० दिवसांनी १५ डिसेंबर रोजी ३९ मंत्र्यांचा शपथविधी झाला. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेले एकनाथ शिंदे व अजित पवार हे उपमुख्यमंत्री १५ दिवसांपासून बिनखात्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करीत आहेत. तसेच १५ तारखेला शपथ घेतलेल्या ३९ मंत्र्यांना दोन दिवसांत खातेवाटपाचा शब्द देऊनही अद्याप खातेवाटप होत नसल्याने सर्वच मंत्री अस्वस्थ आहेत. एवढेच नव्हे तर त्यांचे कार्यकर्तेही आपल्या नेत्याला कोणते खाते मिळणार हे सतत विचारून राजकीय पक्षश्रेष्ठी, संबंधित मंत्री यांना भंडावून सोडत आहेत. पुढील एक ते दोन दिवसांत खाते वाटप जाहीर होईल. खाते वाटपाला विलंब झालेला नाही. पण एक दोन खात्यांबद्दल तिघांमध्ये वाद आहे, अशी कबुली देत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, सरकारातील तिघे नेते एकत्र बसतील आणि एक दोन दिवसांत खात्यांचे वाटप होईल.