पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टँडअप कॉमेडियन व बिग बॉस-17 (Bigg Boss) मधील विजेता मुन्नवर फारुकीला (Munawar Faruqui) कोकणवासीयांबद्दल अनुद्गार काढल्याने प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. एका परफॉर्मन्सदरम्यान मुन्नवरने कोकणवासीयांचा अवमानकारक उल्लेख केला आणि याचा व्हिडीओ लगोलग व्हायरल झाल्यानंतर याच्या जनमानसात, सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत राहिल्या. याबद्दल त्याने लगेच कोकणवासीयांची हात जोडून माफी मागितली आहे.
मुन्नवर (Munawar Faruqui) याने परफॉर्मन्सदरम्यान प्रेक्षकांना उद्देशून तुम्ही कोणत्या भागातील, असा प्रश्न केला. त्यावर एकाने आपले ठिकाण सांगितल्यानंतर मुन्नवर म्हणाला, कोकणी लोक आपला खरा पत्ता लपवत मुंबईचे असल्याचे सांगतात.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांनी जो कोणी मुनव्वरला मारहाण करेल त्याला एक लाख रुपये बक्षीस दिले जाईल, असे म्हटले आहे. समाधान सरवणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'पाकिस्तानप्रेमी मुनव्वर याने कोकणी लोकांची माफी मागितली नाही, तर कोणाला दिसेल त्यांनी त्याला मारा; जो कोणी त्याला मारेल त्याला १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल,' असे त्यांनी म्हटले आहे.
भाजप नेते नितेश राणेही मुनव्वर याच्यावर संतापले. ' त्याच्या (Munawar Faruqui) घरचा पत्ता आम्हाला माहीत आहे. त्याला मालवणी हिसका दाखवावा लागेल. कोकणातील लोकांचा अपमान करत असेल, तर तुझ्यासारखा हिरवा साप पाकिस्तानात पाठवायला जास्त वेळ लागणार नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.