ST fare hike cancelled latest news update
मुंबई: महाराष्ट्रातील पूर परिस्थिती आणि नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) दिवाळीनिमित्त करण्यात येणारी १० टक्के हंगामी भाडेवाढ तत्काळ रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला ही भाडेवाढ मागे घेण्याचे आदेश दिले. थोड्याच वेळात महामंडळाकडून याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सणासुदीच्या काळात, १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत एसटीच्या तिकिट दरामध्ये १० टक्के हंगामी भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती. एसटी महामंडळाकडून नियमित भाडेवाढ यापूर्वीच करण्यात आली होती, अशात ही हंगामी वाढ लागू होणार होती. मात्र, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या भीषण पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाला ही भाडेवाढ रद्द करण्याबाबत सूचित केले.
या सूचनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्काळ हालचाल करत दिवाळीसाठी केलेली ही भाडेवाढ रद्द करण्याचे आदेश एसटी प्रशासनाला दिले. यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांसह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसटी महामंडळाचा हा निर्णय पूरग्रस्त महाराष्ट्राला एकप्रकारे 'दिवाळी भेट'च ठरला आहे.