

मुंबई : राज्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणार्या लाखो विद्यार्थ्यांना आता एसटी प्रवासाचे पास थेट त्यांच्या शिक्षण संस्थेतच मिळणार आहेत. यामुळे पाससाठी एसटी आगारात किंवा पास केंद्रांवर लागणार्या रांगांपासून विद्यार्थ्यांची सुटका होणार असून, त्यांचा वेळही वाचणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंबंधीच्या सूचना स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती दिली.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर 16 जूनपासून शाळा सुरू होत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना घरापासून शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी एसटी बसचा आधार घ्यावा लागतो. शासनाकडून विद्यार्थ्यांना प्रवासात 66.66 टक्के सवलत दिली जाते, म्हणजेच केवळ 33.33 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास मिळतो. यासोबतच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थिनींना एसटीचा मोफत पास दिला जातो. या नवीन योजनेनुसार, शाळा-महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांची यादी एसटी प्रशासनाला पुरवायची आहे. या यादीनुसार एसटी कर्मचारी स्वतः शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पासचे वितरण करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाससाठी वेगळा वेळ काढण्याची किंवा रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज भासणार नाही. परिणामी त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही. यासंदर्भात 16 जूनपासून एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राज्यभरात राबविण्यात येणार आहे. तत्पूर्वी सर्व शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शिक्षण संस्थेतील नवीन वर्षात शिकणार्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणार्या लाखो विद्यार्थी - विद्यार्थिनींना होणार आहे, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
पूर्वी विद्यार्थ्यांना हे पास मिळवण्यासाठी एसटीच्या पास केंद्रांवर जाऊन रांगेत उभे राहावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घ्यावे लागत असत. यात विद्यार्थ्यांचा बराच वेळ जात होता. ही गैरसोय टाळण्यासाठी आता एसटी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.