

मुंबई : देशातील संशोधनाधारित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षमतेचे जागतिक स्तरावर दर्शन घडविणाऱ्या ‘भारत इनोव्हेटस् २०२६’ या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी आयआयटी मुंबईच्या १६ डीप-टेक स्टार्टअप्सची निवड झाली आहे. हे स्टार्टअप्स फ्रान्समधील नाइस येथे १४ ते १६ जूनदरम्यान होणाऱ्या तीन दिवसीय परिषदेत सहभागी होणार असून, जागतिक गुंतवणूकदार, संशोधन संस्था, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि नवोन्मेष क्षेत्रातील धोरणकर्त्यांसमोर आपली उत्पादने व तंत्रज्ञान सादर करणार आहेत.
आयआयटी मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या ‘भारत इनोव्हेटस् डीप-टेक प्री-समिट २०२६’नंतर निवड झालेल्या या स्टार्टअप्सना देशभरातून निवडलेल्या १२० उच्च क्षमतेच्या स्टार्टअप्समध्ये स्थान मिळाले आहे. फ्रान्समधील ‘पॅले देझ एक्स्पोझिशन्स’ येथे होणाऱ्या या कार्यक्रमातून भारतीय डीप-टेक परिसंस्थेला जागतिक व्यासपीठ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे आणि भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘भारत इनोव्हेटस् २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. भारत-फ्रान्स नवोन्मेष भागीदारीला बळ देण्याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकता क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या राष्ट्रीय उपक्रमासाठी आयआयटी मुंबईकडे नोडल संस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
देशभरातील उच्च शिक्षण संस्था आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांमधील समन्वय, कार्यक्रमाचे धोरणात्मक नियोजन, स्टार्टअप निवड प्रक्रिया आणि अंमलबजावणीची धुरा आयआयटी मुंबई सांभाळत आहे. स्टार्टअप प्रदर्शन, गुंतवणूकदारांशी संवाद, संशोधन-उद्योग गोलमेज परिषद, नवोन्मेष प्रदर्शन आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी घोषणांद्वारे भारतीय डीप-टेक क्षेत्राला जागतिक भांडवल, तंत्रज्ञान सहकार्य आणि व्यावसायिकीकरणाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या परिषदेतून केला जाणार आहे. परिषदेच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भारत-फ्रान्स नवोन्मेष सहकार्याला राजनैतिक पातळीवरही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच दिवशी नवोन्मेष क्षेत्रातील विविध सहकार्य करारांची देवाणघेवाणही होणार आहे.
काय असेल जागतिक परिषदेत?
1. सेमीकंडक्टर, जैवतंत्रज्ञान, अवकाश व संरक्षण, आरोग्य व वैद्यकीय तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, ऊर्जा, हवामान बदल, उद्योग ४.०, स्मार्ट सिटी, गतिशीलता, कृषी तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन अशा १३ महत्त्वाच्या क्षेत्रांतील तंत्रज्ञान नवकल्पना या परिषदेत मांडल्या जाणार आहेत.
2. आयआयटी मुंबईच्या ‘सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप’ (साईन) अंतर्गत कार्यरत स्टार्टअप्समध्ये जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील ‘ॲमीस्कॅन हेल्थकेअर’ आणि ‘इम्युनोअॅडॉप्टिव्ह सेल थेरपी’, आरोग्य क्षेत्रातील ‘अयाती डिव्हाइसेस’, ‘हेस्टॅक अॅनालिटिक्स’ आणि ‘लाईफस्पार्क टेक्नॉलॉजीज’ यांचा समावेश आहे.
3. अवकाश व संरक्षण क्षेत्रात ‘बेलाट्रिक्स एरोस्पेस’, ‘आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी’ आणि ‘मनस्तू स्पेस टेक्नॉलॉजीज’ सहभागी होणार आहेत. ऊर्जा व शाश्वत विकास क्षेत्रात ‘इन्फ्लॉक्स वॉटर सिस्टिम्स’, ‘टोरस रोबोटिक्स’, ‘ट्रायनॅनो टेक्नॉलॉजीज’, ‘ऊर्जानोव्हासी’ आणि ‘व्हीडीटी पाइपलाईन इंटिग्रिटी सोल्यूशन्स’ या कंपन्या आपली तंत्रज्ञान उत्पादने सादर करणार आहेत.