

मुंबई : सायन रुग्णालयातील एक्स-रे विभागात देखभालीनंतरही एसीचा स्फोट झाल्याची घटना नकतीच घडली होती. त्यामुळे येथील अग्निसुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत होते. ‘पुढारी’ न्यूजने रुग्णालयातील सुरक्षा साधनांच्या केलेल्या पाहणीत येथील बहुतांश फायर एक्स्टींग्युशरच्या पुनर्भरणाची मुदत संपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
‘पुढारी’ न्यूजने हे वृत्त प्रसिद्ध करताच शनिवारी दिवसभर रुग्णालय प्रशासनाकडून सर्व यंत्रणांची तपासणी करण्यात आली. कालबाह्य व कार्यरत उपकरणांची सविस्तर माहिती गोळा करून अहवाल सादर केला जाणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मंगळवारी 2 एप्रिल रोजी दुपारी एक्स-रे विभागात एसीचा स्फोट होऊन आग लागली होती. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली होती. ‘पुढारी’च्या पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी लावण्यात आलेले फायर एक्स्टींग्युशर एक्सपायर झाल्याचे आढळून आले. काही ठिकाणी रिफिलची मुदत संपून तब्बल दोन महिने उलटल्याचे दिसून आले.
या रुग्णालयात दररोज सुमारे पाच हजार रुग्णांची ओपीडी (बाह्यरुग्ण तपासणी) होते. सकाळच्या वेळेत मोठी गर्दी होत असते. अशा परिस्थितीत आग लागली व अग्निसुरक्षा यंत्रणा निकामी असल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. सायन रुग्णालयाचे फायर ऑडिट 2025 मध्ये झाले असल्याची माहिती आहे. मात्र, प्रत्यक्षात यंत्रणांची स्थिती पाहता प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी प्रक्रियेमुळे उशीर झाल्याचे मान्य केले असून, एका महिन्यात नवीन फायर एक्स्टींग्युशर बसवण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अग्निसुरक्षेबाबतचा हा हलगर्जीपणा गंभीर असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कालबाह्य उपकरणांबाबत प्रशासन अनभिज्ञ
सायन रुग्णालयात एकूण 714 मशिन्स विविध विभागांमध्ये वापरात आहेत. यापैकी काही मशिन्सची मुदत फेब्रुवारी व मार्च महिन्यात संपल्याची बाब समोर आली आहे. मात्र, नेमकी किती मशिन्स कालबाह्य झाली आहेत आणि किती अद्याप कार्यरत आहेत, याची अचूक माहिती रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘पुढारी’ न्यूजने हे वृत्त दाखवल्यानंतर मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
अग्निशामक यंत्रणेत आढळलेल्या त्रुटींची त्वरित दखल घेण्यात आली असून सिलिंडरची संख्या वाढविण्यात आली आहे. सिलिंडरच्या पुनर्भरणासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीच या संदर्भात केंद्रीय खरेदी विभागास रुग्णालयाकडूनच निविदा काढण्यास सांगितले आहे. या प्रक्रियेला किमान एक ते सव्वा महिन्याचा कालावधी लागू शकतो. भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटी टाळण्यासाठी तीन वर्षांचा करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. प्रमोद इंगळे, अधिष्ठाता, सायन रुग्णालय