

मुंबई ः मुंबई विद्यापीठातील शासनअनुदानित पदांवरून निवृत्त झालेले 127 शिक्षकेतर कर्मचारी आजही 2017 पासून प्रलंबित असलेल्या निवृत्तीवेतनाची वाट पहात आहेत. या प्रतीक्षेत 12 कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे. काही कर्मचारी गंभीर आजारांशी झुंजत आहेत, तर कुटुंबीयांना मानसिक आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कारभारासाठी निवृत्त कर्मचार्यांनी आयुष्यभर घाम गाळला. मात्र निवृत्तीनंतर त्यांच्या हातात काहीच पडले नाही. सेवानिवृत्तीनंतर सहा महिन्यांत सर्व देणी अदा करणे बंधनकारक आहे. पण विद्यापीठ प्रशासनानेच या आदेशाची पायमल्ली केली आहे. सात वर्षांत प्रस्तावांच्या नावाखाली फक्त कागदांची अदलाबदल, फाईली फेरनिवड आणि कर्मचार्यांच्या डोळ्यांत धुळफेक हा विद्यापीठाचा खेळ सुरु आहे, असा आरोप या कर्मचार्यांनी केला आहे.
मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, सचिव व कुलगुरू यांना वारंवार पत्रे पाठवली आहेत. मात्र त्यांची दखल घेतलेली नाही. अनेक सेवानिवृत्त कर्मचार्यांना गंभीर आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. वेळेवर निवृत्ती वेतनाच्या प्रतीक्षेत 12 सेवानिवृत्त कर्मचार्यांचे निधन झाले असून, काही गंभीर आजारी आहेत. यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मानसिक तसेच आर्थिक हालअपेष्टांचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे.
महिन्याचा पगार बंद, पेन्शन नाही, वैद्यकीय खर्चासाठी पैसे नाहीत, मुलांच्या शिक्षणाचा भार उचलणे कठीण अशा स्थितीत काहींनी कर्ज काढले, काहींनी आपली संपत्ती विकली. पण निवृत्तीवेतनाच्या फाईली आजही विद्यापीठाच्या टेबलावर प्रलंबित आहेत.
आक्रमक आंदोलनाचा इशारा
“विद्यापीठ प्रशासन जबाबदारी ढकलत शासनावर दोष ठेवते. पण निवृत्त कर्मचार्यांची वेदना कोण ऐकणार? 12 सहकार्यांचे मृत्यू म्हणजे थेट विद्यापीठाची अकार्यक्षमता दिसून येते, असा संताप व्यक्त करत यावर येत्या 15 दिवसांत निर्णय न घेतल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष नरेश वरेकर आणि सरचिटणीस अविनाश तांबे यांनी दिला आहे.