

नवी मुंबई: श्रावण महिन्यामुळे उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी वाढली असून, वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात साबुदाणा, शेंगदाणा, भगर, वरई यांच्या खरेदीला वेग आला आहे. उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढल्याने बाजारात या वस्तूंची उलाढालही वाढली आहे.
श्रावणात उपवास करणाऱ्या नागरिकांकडून साबुदाणा, शेंगदाणा, भगर आणि अन्य उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून एपीएमसीमधील घाऊक बाजारातून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. सध्या शेंगदाण्याचे दर प्रकारानुसार ११५ ते १५० रुपये किलो, तर भगर २०० रुपयांच्या आसपास विकली जात आहेत.
सोमवारी एपीएमसी बाजारात साबुदाण्याची आवक ६८८ क्विंटल झाली असून, त्याचा घाऊक दर ६० ते ७१ रुपये किलो, सरासरी ६५.५० रुपये किलो होता. शेंगदाण्याची आवक ७२६ क्विंटल झाली असून, दर ८० ते १५० रुपये किलो, सरासरी १२० रुपये किलो आहे.
श्रावणातील मागणी पुढील काही आठवडे कायम राहण्याची शक्यता असल्याने उपवासाच्या पदार्थांच्या बाजारपेठेत आणखी तेजी येण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
उपवासाच्या पदार्थांचे सध्याचे प्रतिकिलो दर
जाडा शेंगदाणा : ११५ ते १२० रुपये
स्पेशल शेंगदाणा : १४० ते १५० रुपये
धुंगर शेंगदाणा : १३० ते १४५ रुपये
साबुदाणा नंबर १ : ८० रुपये
साबुदाणा नंबर २ : ७८ रुपये
साबुदाणा नंबर ३ : ६८ रुपये
वरई भगर : २०० ते २१५ रुपये