३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या बोधचिन्हावर कोकणची मोहोर !

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या बोधचिन्हावर कोकणची मोहोर !

मुंबई; संजय कदम : ज्येष्ठ त्रयोदशीला म्हणजेच ६ जून रोजी शिवतीर्थ रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. ज्या दिवशी महाराज शककर्ते सुनील कदम राज्यकर्ते झाले तो पवित्र दिवस सुमारे साडेतीन लाख शिवभक्तांच्या साक्षीने साजरा झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने तयार केलेल्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मूळचे कोकणातील लांजा (रत्नागिरी) तालुक्यात कोंडगे गावचे असलेल्या आणि सध्या बदलापूर येथे वास्तव्यास असलेले इतिहासकार सुनील कदम यांनी हे बोधचिन्ह तयार केले आहे. हे बोधचिन्ह नेमके काय संदेश देते याबाबत सुनील कदम यांनी दिलेली माहिती खास 'पुढारी'च्या वाचकांसाठी… राजदरबारातील राजचिन्हापासून हे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यावेळी राजदरबारात अष्टप्रधान मात्तबर व्यक्ती, शाही पाहुणे उपस्थित होते. त्यात हेन्री ऑक्झिंडन हा इंग्रजांचा वकीलसुद्धा होता. त्याने राजदरबारचे वर्णन करून ठेवले आहे.

सुवर्ण सिंहासन चौथरा : महाराजांचे सिंहासन ३२ मण सुवर्णाचे रत्नजडित असे सिंहासन घडविले होते. त्याला ८ सिंह होते. भारतीय राज्यशास्त्र व धर्मशास्त्राप्रमाणे सार्वभौम राजाला सुवर्ण सिंहासनावर आरूढ होण्याचा नैतिक अधिकार असतो.

शरभ : दोन्ही बाजूस असलेले 'शरभ' म्हणजे प्रचंड शक्तिशाली महाकाय व्याघ्र. त्याच्या पंजाखाली असलेला राजेशाही हत्ती. त्याचा अर्थ बलाढ्य मुसलमानी पादशाह्या जसे मुघल, आदिलशहा, निजामशहा यांना दबवून स्वराज्य स्थापन केले.

चामर :  ऐश्वर्य वैभवाचे प्रतीक असलेल्या चवरी. देवदेवतांचा पूजाअर्चेतील हे साधन. देवत्वाची जाणीव राजास सतत असावी हा यामागचा उद्देश. शिवाजी महाराजांची चामरे सुवर्णमुठींची होती. त्यामुळे त्याचा वापर करण्यात आला आहे.

मोरचेल : चामराप्रमाणे मोरचेल या राजचिन्हाचे महत्त्व आहे. म्लेंच्छ बादशहा ते वापरीत असत. म्हणूनच आपणही त्यांच्याच बरोबरीचे स्वतंत्र राजे आहोत, हे दर्शविण्यासाठी महाराजांनी मोरचेल है. राजचिन्ह स्वीकारले.

केशरी ध्वज : प्रारंभापासूनच केशरी ध्वज स्वराज्याचे अधिकृत निशाण होते. हिंदूसंस्कृती आणि तत्त्वज्ञानाच्या अग्रितेजाप्रमाणे हा अरुणध्वज वारकरी आणि धारकरी यांनी सांभाळला. राजे आग्राला असताना ध्वजाचे वर्णन येते.

अश्वपुच्छ : सुवर्ण भाल्यावरील घोड्याची शेपटी म्हणजे स्वराज्याच्या शक्तिशाली समर्थ घोडदळाचे प्रतीक म्हणून राजसभेत प्रदर्शित केले होते. राजसभेत असे अश्वपुच्छानी युक्त भाले घेऊन भालदार उभे होते.

माहीमरातब : भाल्याच्या टोकावर लावलेला सुवर्णमत्स्य असलेले चिन्ह. अर्थात उघडलेल्या जबड्यातील कराल दंत दाखविलेला सुवर्णाचा मासा. समुद्रावरील सत्ता असलेल्या सार्वभौम स्वराज्याचे बलाढ्य आरमार असल्याचे संदेश असत.

सुवर्णाचा तराजू : राजाचे महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे न्यायदान. याचे प्रतीक म्हणून समसमान पातळीतील सुवर्णाचा तराजू. स्वराज्यात सर्वांनाच समसमान न्याय मिळेल याचे द्योतक असलेले हे राजचिन्ह राजसभेचे भूषण ठरला.

छत्र : छत्र हे राजवैभवाचे चिन्ह. प्रजापती राजाच्या छत्रछायेखाली राजाने प्रजेचे भरणपोषण होते. देव, धर्म आणि भूमी यांचा आधार म्हणजे छत्र. खर तर याच अर्थाने श्री शिवाजी महाराज हे आद्य छत्रपती होते, असे म्हटले जाते.

बोधचिन्हांच्या आकृत्यांचा प्रतीकरूपाने वापर केलेला आहे. ती सर्वच राजचिन्हे शिवरायांच्या दरबारात राज्याभिषेकप्रसंगी होती. या बोधचिन्हातून राज्याभिषेकाचा महत्त्वाचा संदेश जनतेपर्यंत जाईल. हे बोधचिन्ह राज्याभिषेक आणि त्याचे महत्त्व आणि आपण त्यातील संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यास संयुक्तिक ठरेल, असा माझा मानस आहे. यामागील उद्देश आपण समजून घेऊन त्याचा स्वीकार करून प्रचार व प्रसार करावा अशी नम्र विनंती.
सुनील दत्ताराम कदम, इतिहासकार, बदलापूर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news