

मुंबई : शिवडीतील भरदिवसा 2 कोटी 29 लाखांच्या सोन्याचे दागिने लुटीचा पर्दाफाश आरएके मार्ग पोलिसांच्या विशेष पथकाने केला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली सून मास्टरचैन ॲण्ड ज्वेल्स कंपनीचा कर्मचारी शामलाभाई रबार व जगदीशभाई यांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने हा लुटीचा बनाव रचला होता. या दोघांसह गुजरातमधून भानाराम भगराज रबारी आणि लिलाराम नागजी देवासी यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी मूळचे राजस्थानचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 2 कोटी 29 लाख रुपयांचे 2067 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.आरोपी असलेले तक्रारदार कर्मचारी शामलाभाई रबारी व जगदीशभाई हे दोघे मास्टरचैन ॲण्ड ज्वेल्स कंपनीचे सोन्याचे दागिने शिवडीतील एका खासगी कंपनीत हॉलमार्कसाठी सोमवारी दुचाकीवरून घेऊन जात होते.
दुपारी अडीच ते पावणेतीन वाजता शिवडी येथील झकेरिया बंदर रोड, शिवडी कोर्टजवळील आरएके चार रोडजवळ आले असता दुसऱ्या एका बाईकस्वाराने त्यांना ओव्हरटेक करीत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने असलेली बॅग खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी बॅग देण्यास नकार दिला असता त्यातील एकाने पिस्तूलसारख्या दिसणाऱ्या घातक शस्त्रांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन दागिने असलेली बॅग घेऊन तेथून पलायन केले होते.
दिवसाढवळ्या आणि भरस्त्यात घडलेल्या या घटनेने दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनीही तत्काळ दखल घेत तपासासाठी आठ विशेष पथकाची नियुक्ती केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा माग काढला असताते गुजरातला पळून गेल्याचे उघडकीस आले होते.
पथकाने अहमदाबाद येथून लिलाराम आणि भानाराम या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी शामलाभाई आणि जगदीश यांच्या मदतीने ही रॉबरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील संपूर्ण सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
अटकेनंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्यांच्या चौकशीनंतर शामलाभाई आणि जगदीश या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते चौघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
यातील भानाभाई पुण्यातील एका ज्वेलरी शॉपमध्ये तर लिलाराम हा अहमदाबाद येथे कामाला आहे. शामलाभाई याने संपूर्ण कटाची योजना बनविली होती. त्यानेच इतर तिघांच्या मदतीने ही रॉबरी घडवून आणली होती.