

मुंबई : प्रसाद जाधव
एम पूर्व विभागातील शिवाजीनगर आणि बैंगणवाडी परिसरात झोपड्यांवर अनधिकृतपणे तीन ते चार मजली बांधकामे उभारण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप होत आहे. या अनधिकृत बांधकामांविरोधात मनसेच्या महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष तथा उपविभाग अध्यक्ष सतीश वैद्य यांनी एम पूर्व विभागाकडे आतापर्यंत २०० हून अधिक तक्रारी केल्या आहेत. मात्र, वारंवार तक्रारी करूनही संबंधित बांधकामांवर अपेक्षित कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आवश्यक परवानग्या न घेता उभारण्यात येणाऱ्या या बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक वास्तव्यास येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही ठिकाणी बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांची विक्री केली जात असल्याचाही आरोप सतीश वैद्य यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, या बांधकामांची माहिती आणि ठिकाणांची तक्रार संबंधित विभागाकडे देऊनही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने तक्रारी केवळ कागदोपत्रीच राहतात का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अनधिकृत बहुमजली बांधकामांकडे दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याचा पुरावा मानखुर्दच्या जनतानगर परिसरातील दुर्घटनेने दिला आहे. ५ जुलै रोजी याठिकाणी अनधिकृत बहुमजली बांधकामाचा भाग कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मानखुर्द-शिवाजीनगर परिसरातील अनधिकृत व असुरक्षित बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर आणि बैंगणवाडीतील २०० हून अधिक तक्रारींची महापालिकेने गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, धोकादायक व अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सतीश वैद्य यांनी केली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.