

प्रकाश साबळे
मुंबई : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरांतून आलेल्या आंबेडकरी अनुयायींकडून शिवाजी पार्क येथील ग्रंथ प्रदर्शनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक खरेदीतून सुमारे 2 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.
यंदाच्या वर्षी शिवाजी पार्कवरील बुक स्टॉलवर ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाला आंबेडकरी अनुयायी, तरुण - तरुणी भीमसैनिकांची सर्वाधिक पसंती दिसून आली. 5 आणि 6 डिसेंबर या दोन दिवसांत सुमारे 5 हजार प्रती विकल्या गेल्याची माहिती लेखक जगदीश ओहोळ यांनी दिली. तसेच पार्कमधील पुस्तक विक्रेत्यांकडूनसुध्दा आपल्या स्टॉलवर सदर पुस्तक उपलब्ध व्हावे, यासाठी ओहोळ यांच्याकडून आगाऊ प्रती विकत घेऊन विकल्या जात होत्या.
शिवाजी पार्कवर 5 आणि 6 डिसेंबर या दोन दिवसांत सुमारे 2 लाख पुस्तके, ग्रंथ, भारतीय संविधानाच्या प्रती आणि इतर महापुरुषांची पुस्तके, साहित्य विक्री होते. देशभरांतील विविध साहित्यिकांसह लेखकांची पुस्तके एकाच छताखाली अनुयायींना खरेदीसाठी उपलब्ध होतात. यामुळे आंबेडकरी अनुयायींचा पुस्तक खरेदीकडे मोठा ओढा असतो. शिवाजी पार्कवर यंदा सुमारे 300 ते 400 स्टॉल लावण्यात आले होते. ज्यामुळे वर्धा, नागपूर, पुणे, नाशिक अशा ठिकाणांहून वाचक आणि व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. एका पुस्तकामागे वाचकांना 70% पर्यंत सवलत मिळते. त्यामुळे खरेदीसाठी आंबेडकरी अनुयायींची गर्दीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात असते, अशी माहिती शैलेंद्र बुक स्टॉलचे विक्रेते शैलेंद्र कांबळे यांनी दिली.