

Chhatrapati Shivaji Maharaj History
मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या पुस्तकांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता देशभर शिकविला जाणार आहे. तसेच राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करावी, या राज्य सरकारच्या मागणीलाही तत्काळ मान्यता दिली आहे. याबाबत आदेशही काढण्यात येत आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी रविवारी पुण्यात दिली.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्यातर्फे गणेश कला क्रीडा मंचमध्ये आयोजित पुणे बालपुस्तक जत्रा कार्यक्रमात भुसे बोलत होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
भुसे म्हणाले, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर व्यापक पातळीवर शिकवला गेला पाहिजे, ही मागणी त्यांनी लगेचच मान्य करून तत्काळ अंमलबजावणीचे निर्देशही दिले. तसेच अभिजात दर्जा मिळालेली मराठी इतर माध्यमांत सक्तीची केली पाहिजे, अशी मागणी केली. त्यानुसार सीबीएसईने महाराष्ट्रात मराठी शिकवण्याचे निर्देश दिले आहेत. आणखीही काही विषयांत केंद्राचे सहकार्य मिळणार आहे.