Dasara Melava 2025 : ‘बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं…', भरपावसात शिवतिर्थावर 'उद्धव'गर्जना; वाचा ठळक मुद्दे

Uddhav Thackeray Shivsena Dasara Melava: ‘जे पळालं ते पितळ; सोनं माझ्याकडे!’, शिवतिर्थावरून उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे गटावर डागली तोफ
Dasara Melava 2025 : ‘बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं…', भरपावसात शिवतिर्थावर 'उद्धव'गर्जना; वाचा ठळक मुद्दे
Published on
Updated on

Shivsena UBT Uddhav Thackeray Dasara Melava 2025 Speech:

मुंबई : ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पारंपरिक दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. मुसळधार पाऊस सुरू असतानाही, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने मैदानात उपस्थिती लावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील आपले अढळ निष्ठा आणि भव्य समर्थन दर्शवले. मेळाव्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईत पावसाने जोर धरला होता. तरीही, पावसाची तमा न बाळगता, राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक हजारोंच्या संख्येने शिवाजी पार्कवर जमा झाले होते. संपूर्ण मैदान भगव्या शिवशक्तीने भरून गेले होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिंदे गट आणि भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. अनेक पक्षांचे लक्ष आपली शिवसेना फोडण्याकडे आहे, अशी थेट टीका करत त्यांनी पक्षाशी बंडखोरी करणारे हे 'पितळ' होते, तर जीवाला जीव देणारे शिवसैनिक हेच आपले खरे 'सोनं' असल्याची भावनिक साद घातली.

‘जे पळालं ते पितळ, सोनं माझ्याकडे आहे’

एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘अनेक पक्षांचं लक्ष माझी शिवसेना फोडण्याकडे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पळवलं ते पितळ होतं. माझं खरं सोनं माझ्याकडे आहे.’ शिवसैनिकांच्या निष्ठेचा गौरव करताना ते पुढे म्हणाले, ‘माझ्यासाठी हे माझं सोनं आहे. जीवाला जीव देणारी माणसं, निष्ठावान शिवसैनिक हेच माझं सोनं आहे. या सोन्यामुळे मी पुन्हा उभा राहीन.’

‘गद्दारांनी शेतकऱ्यांचे पैसे पळवले’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले, ‘गद्दार लोक शेतकऱ्यांचे पैसे घेऊन गुवाहाटीला पळून गेले,’ असा थेट आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आणि सरकारला कडक इशारा दिला. मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली.

बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं…

यावेळी बोलताना, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फुटीवर भाष्य केले आणि एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले, ‘वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवावर कितीही शाली टाका. गाढव ते गाढवच असते. अमित शाहांच्या जोड्याचा भार वाहणारे ते गाढव आहे. जनता यांना एक दिवस जोडे मारणार आहे. तो दिवस काही लांब नाही, असे म्हणत ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली.

कळाबाईच्या कारभाऱ्याने स्वत:ची कमळं फुलवून घेतली

ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजपाच्या कारभारावरही टीका केली. ते म्हणाले, ‘अनेकजण सांगत होते की आजचा मेळावा कसा घेणार. मी सांगत होतो की नेहमी जसा मेळावा घेतो, तसाच यंदाही मेळावा घेणार. उलट मी सांगायचो की यावेळी मोठा मेळावा होणार. असा जो चिखल झाला आहे, त्याला कारणीभूत ही कमळाबाई आहे. तुम्ही म्हणाल की पाऊस आणि कमाळाबाईचा काय संबंध आहे. पण कळाबाईच्या कारभाऱ्याने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. बाकीच्यांच्या आयुष्याचा चिखल करून टाकला आहे,’ असे म्हणत भाजपाने मुंबईत चांगले काम केले नाही, असा आरोप केला.

शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळालीच पाहिजे

‘मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळालीच पाहिजे. सरकारने जेवढी होईल तेवढी मदत शेतकऱ्यांसाठी केली पाहिजे. सरकारी निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा,’ असा जोरदार इशारा त्यांनी दिला. केवळ घोषणाबाजी न करता, तातडीने प्रत्यक्ष मदत देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

‘शेतकऱ्याच्या घरादाराचा चिखल झाला आहे. शेती वाहून गेली आहे. शेतकरी आज विचारतोय आम्ही खायचं काय? ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती. एवढं मोठं संकट कधी आलं नव्हतं. मराठवाडा आपत्तीग्रस्त झाला आहे. मी शिवसैनिकांना आवाहन करतो. हे संकट फार मोठं आहे. जे करता येईल ते फूल नाहीतर फुलाची पाकळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत देऊ. ते करायला पाहिजे’, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत

उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनेसचे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबद्दल उपस्थित प्रश्नांना उत्तर दिले. ते म्हणाले, ‘पुढील राजकीय दिशा काय असेल? राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. ५ जुलैच्या घटनेकडे पाहा. मी तेव्हाच सांगितले होते की, आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत,’ असे महत्त्वपूर्ण वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news