मुंबई : गोरगरीब जनतेला स्वस्त दरात पोटभर जेवण देणारी शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निर्माण झालेल्या निधीच्या टंचाईचा फटका शिवभोजन थाळीला बसला असून, गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील 1,881 केंद्रचालकांना अनुदानाचे पैसेच मिळालेले नाहीत. बिले थकल्याने अनेक केंद्रे बंद पडली आहेत.
महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात गरीब व गरजूंना केवळ 10 रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवभोजन थाळी सुरू केली. ग्रामीण भागात प्रतिथाळी 25 रुपये आणि शहरी भागात 40 रुपये सरकारकडून अनुदान दिले जाते. सध्या राज्यभर दररोज 1.70 लाख थाळ्या पुरवल्या जातात.
या योजनेसाठी दरवर्षी सुमारे 227 कोटी रुपयांचा खर्च येतो. मात्र, महायुती सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पात फक्त 70 कोटी रुपयांची तरतूद केली असून, त्यातील केवळ 21 कोटी एप्रिलपूर्वीच वितरित करण्यात आले आहेत. एप्रिलनंतर एक रुपयाही मिळालेला नाही. इतर योजनांप्रमाणेच या योजनेतील निधीही लाडकी बहीण योजनेत वळवण्यात आल्याने शिवभोजन योजनेची बिले थकली आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीमधून निधी मिळाला नाही, तर ही योजना बंद पडू शकते, अशी भीती एका वरिष्ठ अधिकार्याने व्यक्त केली.
केंद्रचालकांचे हाल
गेल्या तीन वर्षांत 200 हून अधिक शिवभोजन केंद्रे बंद पडली आहेत. 100 थाळी केंद्र चालवायला दरमहा 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. सरकारकडून अनुदान 1.14 लाख मिळणे अपेक्षित आहे; पण तेही सहा महिन्यांपासून अडकले आहे. किराणा दुकानदार, कामगारांचे पैसे देणे अशक्य झाले आहे, असे महाराष्ट्र शिवभोजन चालक कृती समितीचे सदस्य कय्युम शेख यांनी सांगितले.
शिवभोजन केंद्रात बहुतांश महिला कामगार असतात. त्यांना सुमारे 8 हजार रुपये पगार दिला जातो. परंतु, त्यांचाही पगार रखडल्याने महिला कामगारांनी शासनाला पत्र देऊन लाडकी बहीण योजनेऐवजी शिवभोजन योजनेचे पैसे द्यावेत, अशी मागणी केली आहे, असेही शेख यांनी सांगितले.