

पुढारी ऑनलाईन डेस्क: "टप्प्याटप्य्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकं फुटणार आणि ती भाजपसोबत जाणार", असा खळबळजनक दावा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? असा दावा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून वारंवार करण्यात येत आहे. यावरून ठाकरेंच्या सर्व खासदारांनी आज (दि.७) पत्रकार परिषद घेत शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व दावे खोडून टाकले. यावेळी आयोजित परिषदेत अरविंद सावंत बोलत होते.
मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेबाबत ऑपरेशन टायगरचे संकेत दिले होते. यावर आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलताना अरविंद सावंत म्हणाले, "ठाकरेंच्या शिवसेनेतील एकही खासदार शिंदेंच्या संपर्कात नाही. शिंदेंच्या पायाखालची वाळू सरकलीय. त्यामुळेच खोट्या बातम्या ते पेरत आहेत. शिंदेंच्या सेनेकडून केवळ पुड्या सोडण्याचे काम सुरू आहे. एकनाथ शिंदेंची सेना फुटणार असे आरोप होत आहेत. परंतु, एकनाथ शिंदेंचाच एक मंत्री आमदारांसोबत भाजपात जातोय, असा दावादेखील सावंत यांनी केला.
ठाकरेंची शिवसेना नाही तर, टप्प्याटप्य्यानं एकनाथ शिंदेंची लोकं फुटणार असून, ते भाजपसोबत जाणार असल्याचेही अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही भाजसोबत होतो पण भाजपवासी झालो नाही. आज काँग्रेससोबत आहे. परंतु आम्ही काँग्रेसवासी कधीच होणार नाही. कालही शिवसेनेत होतो. आजही एकनिष्ठपणे शिवसेनेत आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सर्व खासदारांची वज्रमुठ म्हणजे "टायगर जिंदा हैं', असेदेखील खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद स्पष्ट केले. यावेळी अनिल देसाई यांच्यासह सर्व खासदार उपस्थित होते.