मुंबई; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून सुरू झालेले राजकीय रणकंदन आता ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर पोहोचले आहे. शिंदे गटाने बॅनरबाजी करत आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तर 'मातोश्री' बाहेर बॅनरबाजी करण्यापेक्षा वाघनखांबाबत इतिहासकार आणि तज्ज्ञांनी उपस्थित केलेल्या शंकेचे निरसन करा, असा पलटवार ठाकरे गटाने केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमसोबत राज्य सरकारचा सामंजस्य करार झाला. मात्र, काही इतिहासकारांसह ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या वाघ नखांबाबत संशय व्यक्त केला होता.
व्हिक्टोरिया अल्बर्ट वस्तुसंग्रहालयानेच ही वाघनखे शिवाजी महाराजांनीच वापरली याबाबत ठाम दावा केलेला नाही. त्यामुळे भावनांचा खेळ करू नये, राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाने ठाकरेंना डिवचण्यासाठी 'मातोश्री' बाहेरच बॅनर लावले आहे
त्यावर 'अफजल दुष्ट संहारिला, श्रीमंत योगी असा आपला, तीच वाघ नखे आणणार परत शिंदे सरकारने घेतले व्रत, छत्रपतींची घेऊन शपथ, शिंदे सरकार चालते पथ' असा मजकूर या बॅनरवर देण्यात आला आहे. भावनिक खेळी करू नका. राजकारणासाठी शिवरायांचा वापर करणाऱ्यांना जनता आपली वाघनखे दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा पलटवार ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केला आहे
शिवरायांची वाघनखे भारतात आणण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली आणि त्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, 'भाजपला एकट्याला श्रेय मिळू नये यासाठी शिंदे गटाचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. शिंदे गटाच्या बॅनरबाजीत कुठेच एकाही भाजप नेत्याचा फोटो अथवा उल्लेख नव्हता. शिवाय सामंजस्य करारासाठी मंत्री मुनगंटीवार आणि विभागाचे पथक लंडनला गेले. त्यांच्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत लंडनला रवाना झाले. त्यामुळे वाघनखे भारतात आणण्याच्या मोहिमेत आमचाही सहभाग असल्याचे दाखविण्याचा हा शिंदे गटाचा आटापिटा असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे.