मुंबई : गोवंडीतील महापालिकेच्या पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता हा प्रश्न काही सुटत नाही. ऑगस्टमध्ये पाच अतिरिक्त डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता त्यांचा कार्यकाळही संपत आहे. त्यात दैनंदिन बाह्य रुग्णांची संख्या ७०० ते ८०० पर्यंत गेली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी आठ डॉक्टरांची गरज आहे.
गोवंडी व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. दुसरे शासकीय रुग्णालय येथे नसल्याने शताब्दी हॉस्पिटल हा गोरगरिबांसाठी मोठा आधार ठरला आहे. काही महिन्यांपूर्वी येथे दैनंदिन ६०० ते ७०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येत होते.
आता हा आकडा आठशेच्या वर जात आहे. त्यामुळे आहे त्या मुनष्यबळात वैद्यकीय सेवा पुरवणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराविना घरी जावे लागत आहे. ऑगस्टमध्ये पाच अतिरिक्त डॉक्टरांची जानेवारी २०२६ पर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा कार्यकाळही आता संपत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय आणखी वाढणार आहे.
बाह्य रुग्ण विभागात किमान दहा ते बारा डॉक्टरांची आवश्यकता आहे. परंतु सध्या येथे कायमस्वरूपी ४ ते ५ अतिरिक्त डॉक्टर असे ९ डॉक्टर आहे. पाच डॉक्टरांची नियुक्ती कालावधी संपल्यानंतर ते परत जातील. त्यामुळे हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात अजून किमान ८ कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.
अतिरिक्त डॉक्टर देण्यात येतील...
पुरेशा संख्येने डॉक्टर्स रूजू झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता सेवा सुरू करण्यात आली आहे. रुग्णांना उत्तमरित्या सेवासुविधा मिळत आहे. काही डॉक्टरांची कमतरता असून त्यांची लवकर नियुक्ती करण्यात येईल, असे पालिकेच्या आरोग्य विभागातील एका ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
ऑगस्टमध्ये पाच अतिरिक्त डॉक्टरांची जानेवारी २०२६ पर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्याचा कार्यकाळ जानेवारी २०२६ पर्यंत संपणार आहे. त्यामुळे हे डॉक्टरही कमी होणार आहेत.