

मुंबई : अमेरिकन कर्जरोख्यांच्या परताव्याने गाठलेल्या १९ वर्षांच्या उच्चांकामुळे विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतीय शेअर बाजारातील आकर्षण कमी झाले आहे. कच्च्या तेलाच्या भावाने घेतलेल्या उसळीमुळे रेपो दरात वाढीची भीती गुंतवणूकदारांना सतावत आहे. त्याचा विपरीत परिणाम गुरुवारी शेअर बाजारात पाहायला मिळाला. सेन्सेक्स १,२४७ आणि निफ्टी निर्देशांक ३८३ अंकांनी कोसळला.
सेन्सेक्स सकाळच्या सत्रात १,२६४ अंकांनी खाली आला होता. बाजार बंद होताना १.६६ टक्क्याच्या घसरणीसह सेन्सेक्स ७३,५८० अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक १.६४ टक्क्याने घसरून २३ हजार ६३ अंकांवर विसावला. सेन्सेक्सच्या घसरणीमुळे बीएसईतील गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
कच्च्या तेलाचे भाव पुन्हा शंभर डॉलर्सपार
अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चेची साशंकता अद्याप कायम असल्याने ब्रेंट क्रूड ऑईलचे भाव दोन टक्क्यांहून अधिक वाढून १०५ डॉलर्स प्रतिबॅरलवर गेले. तर, यूएस डब्ल्यूटीआयचा भाव १.४४ टक्क्याने वाढून ९३.६० डॉलर्स प्रतिबॅरलवर गेला आहे. कच्च्या तेलाच्या भावातील वाढीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया १४ पैशांनी कमकुवत होऊन ९५.८७ रुपयांवर बंद झाला.
‘या’ प्रमुख कारणांमुळे घसरण
भारतीय शेअर बाजार गुरुवारी तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला असून, ही घसरण विविध जागतिक, आर्थिक आणि क्षेत्रांतर्गत कारणांमुळे झाली आहे. गेल्या दहा वर्षांत अमेरिकन ट्रेझरी बॉण्डचा परतावा वाढून तो सुमारे ५.११ टक्के झाला. हा २००७ नंतरचा उच्चांक ठरला. यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा सुरक्षित डॉलर मालमत्तेकडे वाढला. परिणामी, भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमधून परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पैसा काढून घेतला आणि भारतीय रुपयावर दबाव आला.
अमेरिका-इराण यांच्यातील तणाव : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या राजकीय तणावामुळे मध्य पूर्व भागातून होणाऱ्या तेल पुरवठ्यात अडथळा येईल अशी भीती निर्माण झाली. या
भू-राजकीय अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी बाजारात जोखीम घेणे टाळले. त्यामुळे तेलाच्या किंमती आणखी वाढल्या आणि जागतिक बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले.