

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ((एमसीए) निवडणुकीमध्ये राजकारण आणू नका, असे आवाहन ज्येष्ठ क्रिकेट संघटक, खासदार शरद पवार यांनी केले. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या बैठकीत बुधवारी (दि.२९) पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले.
मी एमसीएमध्ये कधीही राजकारण आणले नाही. हीच अपेक्षा मला यावेळीदेखील आहे. माझ्यासह आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी हेच केले. एमसीएच्या वास्तूमध्ये प्रवेश करताना राजकारणाचे जोडे बाजूला काढून ठेवले पाहिजे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हेच केले आहे. ते देखील क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत आणि ते क्रिकेटच्या बाजूने उभे राहतील, असा विश्वासही पवार यांनी यावेळी बोलून दाखवला. विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक हे पुन्हा एकदा एमसीएच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत पवार यांनी यावेळी दिले.अजिंक्य यांनी अध्यक्ष म्हणून अनेक चांगली कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना आणखी एक संधी मिळायला हवी, असे शरद पवार म्हणाले.