

सासवड : केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. काहीही झालं तरी त्यांना विमानतळ करायचं आहे. माझ्या हातात सत्ता नाही पण मी या सात गावातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. या लोकांनी विमानतळासाठी खुशीने जागा दिली तर ठीक आहे. माझं काही म्हणणं नाही. पण हे सरकार विमानतळ लादत असेल तर तसं होऊ देणार नाही. तुमच्या हातात सत्ता आहे पण लोकशाहीत विरोध करण्याचा सर्वांना अधिकार आहे. लोकांचे संसार उद्ध्वस्त करून मार्ग काढायचा नाही. या सरकारचा याच जागेवर विमानतळ करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. (Latest Pune News)
खानवडी (ता. पुरंदर) येथे सात गावातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांशी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी कॉंग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे, तालुकाध्यक्ष माणिक झेंडे पाटील, बबुसाहेब माहूरकर, दत्ताआबा चव्हाण, पुष्कराज जाधव आदींसह सात गावातील प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.
या वेळी खा. पवार म्हणाले, गेले काही महिने तुमच्यात अस्वस्थता आहे. या सात गावातील तुम्ही जे 10 लोक द्याल त्यांना घेऊन सरकारशी चर्चा करून मार्ग काढू, इथे राजकारण होऊ द्यायचं नाही. आपण सगळे इथे एक आहोत. नंतर जे राजकारण करायचं आहे ते करा, इथे करायचं नाही. याबाबत ते म्हणतील आपण बैठक घेऊ, या प्रश्नी मार्ग काढू. हा मार्ग सक्तीने काढून चालणार नाही, हे आम्ही सरकारला सांगू. मोजणी वेळी काही तरी वाद झाला होता, तसं करू नका. लहान अधिकाऱ्यांशी बोलून काही होणार नाही. आपण वरिष्ठांशी बोलून मार्ग काढू, असे खा. पवार म्हणाले.
खा. पवार म्हणाले, समजा एका व्यक्तीला एक एकर जमीन असेल तर त्याला विशिष्ट रक्कम द्यायची, बाजारभाव मिळाला पण त्याच सोबत विशिष्ट रक्कम दिली. इथेही विशिष्ट रक्कम दिली जाते. शेतकऱ्यांना उद्धवस्त करून विकास होत नसतो. मला बारामती, मुंबईत लोकं भेटायला यायचे आणि एकच विमानतळाबाबत सांगायचे. तुमच्यातील काही आणि जिल्हाधिकारी यांच्याशी एकत्र बसून चर्चा केली. राज्यात अनेक प्रकल्प करण्यात माझा हात होता. पुणे हिंजवडीमध्ये साखर कारखाना होणार होता, पण तिथे आयटी पार्क केलं, तिथं मुलांच्या हाताला काम दिले. हिंजवडी आणि मगरपट्टा येथे नवीन सूत्र लागू केला. याआधीही नवी मुंबईच्या विमानतळाबाबत प्रश्न आला होता. नवी मुंबई शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले आहेत. त्यामुळे मी उद्घाटनाला गेलो नाही. मी जी जागा सुचवली होती त्यावर ते तयार करायला नसल्याचे खा. पवार म्हणाले.
खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी ज्या सूचना मांडल्या त्यावर आपण पाठपुरावा करू. येथील शेतकऱ्यांच्यावर अन्याय होता कामा नये. आपण एक कमिटी करू. आताचे आमदार, माजी आमदार त्यांना एकत्र करण्याची जबाबदारी मी घेते, पालकमंत्री यांच्याशी पण बोलू, पक्षीय मतभेद बाजूला ठेवू. शरद पवार यांच्या समोर आपले म्हणणे मांडले आहे. आपण त्यावर मार्ग काढू.