शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा; राष्ट्रवादीत भूकंप

शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा; राष्ट्रवादीत भूकंप
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : 1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ वाटचालीनंतर कुठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. कुठे थांबायचे हे मला कळते. त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतला आहे… राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केला आणि महाराष्ट्राचे राजकारण या धक्क्याने हादरून गेले.

'लोक माझे सांगाती' या आपल्या राजकीय आत्मकथेच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यातच शरद पवार यांनी ही घोषणा केल्याने उपस्थित कार्यकर्ते, नेते, पदाधिकार्‍यांना शोक अनावर झाला. अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्या, असा हक्काचा इशारा देत त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आणि सभागृहाबाहेर ठाण मांडले. राष्ट्रवादीचे बडे नेतेही मनधरणी करू लागले. पक्षात हा भूकंप घडवून 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी शरद पवार दुपारचे जेवण आणि विश्रांतीसाठी परतले, तरी मुंबईसह राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हलकल्लोळ सुरूच होता. शेवटी विरोधी पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, छगन भुजबळ आदी नेत्यांनी 'सिल्व्हर ओक'वर जाऊन पुन्हा शरद पवारांची मनधरणी केली. राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्या, अशी विनंती केली. तेव्हा शरद पवारांनी निर्णयाचा फेरविचार करण्यास दोन-तीन दिवस द्या, असे सांगत राजकीय खळबळीच्या पहिल्या दिवसाला विराम दिला.

आपण दोन-तीन दिवसांत आपला फेरविचार जाहीर करू. मात्र, त्यासाठी पदाधिकार्‍यांनी राजीनामा सत्र थांबवावे, आंदोलने, उपोषणे करू नयेेत, अशी अटही शरद पवारांनी घातल्याचे अजित पवार यांनी माध्यमांसमोर सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष पुन्हा शरद पवारच की भाकरी फिरवण्याची सुरुवात खुद्द पवारांपासूनच सुरू होणार, यासाठी आता दोन-तीन दिवस थांबावे लागेल.

'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्राची पहिली आवृत्ती आली तेव्हा त्याची एवढी चर्चा झाली नव्हती. या नव्या आवृत्तीत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या संबंधांवर नवा प्रकाश टाकल्याने गेले दोन दिवस हे आत्मचरित्र बातम्यांचा विषय बनले. मात्र, या बातम्याही फार चर्चा घडवणार्‍या ठरल्या नाहीत. या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा करून शरद पवार यांनी सारीच कसर भरून काढली. त्यांच्या या घोषणेने महाराष्ट्राचे राजकारण काही क्षण जागीच थबकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य धोक्यात आले, असे खुद्द नेत्यांना वाटू लागले. शरद पवारांशिवाय आजच्या राजकीय वादळात वाटचाल कशी करायची, असा प्रश्न छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे यासारख्या नेत्यांनीही सभागृहातच उपस्थित केला.

नवा अध्यक्ष निवडीसाठी जम्बो समिती

अलीकडेच मुंबईत चेंबूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या युवा मंथन कार्यक्रमात पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आल्याचे सूतोवाच केले होते. ही सुरुवात पवारांनी स्वत:पासूनच करत पक्षाला जबर धक्का दिला. नवा अध्यक्ष निवडण्यासाठी शरद पवारांनी एक जम्बो समितीही आपल्या भाषणातच जाहीर केली. पवार म्हणाले, पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा, याचा निर्णय ही समिती घेईल. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड हे सदस्य असावेत. तसेच इतर सदस्य म्हणून फौजिया खान-अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, धीरज शर्मा-अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सोनिया दुहन- अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांची नावे शरद पवारांनी जाहीर केली. ही समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने झटत राहील, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.

नेत्यांना अश्रू अनावर

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा शरद पवार यांनी करताच राष्ट्रवादीच्या ज्येेष्ठ नेत्यांसह पदाधिकार्‍यांनी या निर्णयाला विरोध केला. अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक जण बराच वेळ शरद पवार यांची समजूत काढत होते. जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत सभागृहातून आम्ही बाहेर जाणार नाही, अशी विनंतीवजा धमकी पदाधिकार्‍यांनी दिली. मात्र, पवार यांनी त्यांच्या निर्णयात बदल केला नाही. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पवार यांची समजूत काढावी, असा आग्रह धरण्यात आला. मात्र, या दोघांनीही आपण काहीही बोलू शकत नसल्याचे स्पष्ट केले. हतबल झालेल्या पदाधिकार्‍यांनी बाजूलाच बसलेल्या प्रतिभाताई पवार यांना विनंती करून पाहिली. परंतु, त्यांनीही पवारच निर्णय घेऊ शकतात. आपल्या हातात काहीही नसल्याचे सांगितल्यामुळे सर्वांच्या अपेक्षा मावळल्या.

बराच वेळ झाला तरी पवार आपल्या निर्णयापासून तसूभरही मागे सरकले नाहीत. त्यामुळे पवार जोपर्यंत निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत सभागृहातून बाहेर न जाण्याचा इशारा देणार्‍या काही पदाधिकार्‍यांनी अखेर व्यासपीठाकडे धाव घेतली. वातावरण तापत असल्याचे पाहून प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनीही व्यासपीठ गाठले. पोलिसांनी संरक्षक कडे करण्याचा प्रयत्न केला असता, अजित पवार यांनी त्यांना रोखले. हा आमचा पक्षातील मामला आहे. आपण पुढे येऊ नये, अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली आणि पोलिस आपल्या जागेवर थांबले.

शेवटी प्रफुल्ल पटेल यांनी हा तिढा सोडवण्यासाठी शक्कल लढविली. पवार यांची जेवणाची वेळ झाली आहे. त्यांना डॉक्टरांनी वेळेवर जेवण घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांना जाऊ द्या, अशी विनंती पटेल यांनी केली; तर अजित पवार यांनीही त्यांना साथ दिली.

दरम्यान काही वेळाने राष्ट्रवादीचे प्रमुख नेते सायंकाळी 'सिल्व्हर ओक'वर जाऊन फेरविचार करण्याबाबर पवार यांना विनंती करू, असे आश्वासन दिल्यानंतर पदाधिकार्‍यांना ऐकणे भाग पडले. त्यानंतर गराड्यातून वाट करत पवार निवासस्थानाकडे निघून गेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news