मुंबई : गेल्या २२ दिवसापासून आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या हुंकार आंदोलनाला बुधवारी (दि.9) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.यावेळी खासदार निलेश लंके, आमदार रोहित पवार उपस्थित होते.
राज्यातील सुमारे ६७ हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांना अनुदानाचा वाढीव टप्पा संदर्भांत १४ ऑक्टोबर २०२४ ला काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी १८ जून २०२५पासून आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यामधून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात आल्याने मैदान तुडूंब भरले आहे. शिक्षकांच्या या आंदोलनाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी भेट दिली.यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले,शिक्षक हे पिढी घडवण्याचे काम करतात.आपल्या न्याय मागण्यासाठी व ज्ञान दानाची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांना संघर्षाची वेळ येत हे दुर्दैवी आहे. ही जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही. शिक्षकांना सन्मान देण्याची भूमिका सरकारची हवी, शिक्षकांना कष्टाची किंमत टप्प्याटप्प्याने का ? असा प्रश्न करून ते म्हणाले,२०२४ मध्ये निर्णय घेऊनही अद्याप अनुदान नाही,हे चुकीचे आहे. शिक्षकांना इतर सरकारी कामाची जबाबदारी असते.
पावसाचा विचार न करता शिक्षक या ठिकाणी बसले आहेत.याची दखल सरकारने घ्यावी. अनुदानाचा निर्णय हा आज किंवा उद्या गुरुवारी होईल त्यामुळे चिंता करू नका. दरम्यान,आमदार रोहित पवार हे मंगळवारी रात्रीपासून आंदोलन स्थळी बसून होते. पुन्हा ते बुधवारी (दि.9) रोजी पहाटे आंदोलन स्थळी आले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले
शिक्षक समन्वय संघाच्यासमवेत आज बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक आहे.या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हजर राहणार आहेत, असे समन्वय संघाने सांगितले आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिक्षक समन्वय संघाच्यासमवेत आज बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक आहे.या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हजर राहणार आहेत, असे समन्वय संघाने सांगितले आहे.त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.