

मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी विशेष गुणवत्ता यादी जाहीर झाली असून या यादीसाठी अर्ज केलेल्या एकूण ३५ हजार २८ विद्यार्थ्यांपैकी २७ हजार ६३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. यापैकी १८ हजार ७०३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज अलोट झाले असले तरी अजूनही सात हजार ३८९ विद्यार्थी प्रवेशाविना राहिलेले आहेत. अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या विशेष फेरीची यादी जाहीर झाली. या यादीसाठी ३५ हजार २८ विद्यार्थी पात्र होते, त्यापैकी २७ हजार ६३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.
बहुतांश महाविद्यालयात असलेल्या विविध शाखांमध्ये जागा फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे अशा महाविद्यालयाची कट ऑफ जाहीर झालेली नाही. या विशेष फेरीसाठी एकूण १ लाख ३४ हजार ९९२ जागा उपलब्ध होत्या. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलोट झाले आहे, त्यांनी १६ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित कॉलेजमध्ये जावून प्रवेश घ्यावा, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांस पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले असल्यास प्रत्यक्ष संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जावून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. जर विद्यार्थ्यास त्यांच्या पसंतीक्रमाच्या २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले असेल आणि त्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांस प्रवेश हवा असेल तर घ्यावा, अन्यथा पुढील फेरीच्या सूचना प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या जातील, त्याप्रमाणे कार्यवाही करावी, अशा सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी एसएमएसवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष आपल्या लॉगीनमध्ये आपल्याला केंद्रीय कोट्यांतर्गत कोणते कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले हे पाहूनच संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करण्यासाठी जावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.