मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईमध्ये तस्करीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांत सात प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने अटक केली. या प्रवाशांकडून १० कोटी ३३ लाखांचे सोने, विदेशी चलन आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले. त्यात दोन विदेशी नागरिकांसह पाच भारतीय प्रवाशांचा समावेश आहे. विदेशातून सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्यानंतर सीमा शुल्क विभागाने विदेशातून येणार्या प्रवाशांवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते.
१० जुलै ते १४ जुलै २०२४ या कालावधीत विविध कारवाईत या अधिकार्यांनी सात प्रवाशांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी दोन प्रवाशी उत्तरप्रदेश व झारखंडचे रहिवाशी आहे. त्यांच्याकडून या अधिकार्यांनी १९५० ग्रॅम वजनाचे सोन्याची भुकटी जप्त केली आहे. ती भुकटी त्यांनी मेणात वितळवून आणली होती. अन्य एका कारवाई या अधिकार्यांनी ३१९९ ग्रॅम वजनाचे सोनेमिश्रीत मेण जप्त केले आहे. त्याची किंमत १ कोटी ८९ लाख रुपये इतकी आहे. ते सोने विमानाच्या प्रसाधनगृहात लपविण्यात आले होते. ही कारवाई सुरु असताना दोन विदेशी नागरिकांना या अधिकार्यांनी अटक केली आहे. ते दोघेही बँकॉकला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. त्यांच्याकडून या अधिकार्यांनी ४४ लाख ७६ हजार रुपयांचे युरो, अमेरिकन व न्यूझीलंड डॉलर जप्त केले. ते विदेशी चलन त्यांनी लॅपटॉप बॅगेतील चोर कप्यात लपवून ठेवले होते. सोने तस्करीच्या गुन्ह्यांत यापूर्वी या अधिकार्यांनी सोळा प्रवाशांना अटक करुन त्यांच्याकडून २ कोटी १६ लाख रुपयांचे सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केले होते.