

पुढारी ऑनलाईन डेस्क : मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबतचे वकीलपत्र घेण्यास ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम तयार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत उज्ज्वल निकम यांनी गुरूवारी (दि.१६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत जवळपास १० मिनिटे चर्चा केली.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिंसेबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि सिद्धार्थ सोनवणे यांना अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. त्याचा शोध बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची तिन्ही पथक घेत आहेत. तसेच या प्रकरणाशी संबंधित असलेल्या वाल्मिक कराड यालाही खंडणीप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्यावरही मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी वकीलपत्र घ्यावे, अशी मागणी केली जात होती. याचे वकीलपत्र घेण्यास अॅड. निकम तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.