

Shalinatai Patil passes away
मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील (वय ९४) यांचे शनिवारी (दि.२०) सायंकाळी निधन झाले. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सातारा येते अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत .
शालिनीताई सातारा जिल्ह्याच्या ज्येष्ठ नेत्या होत्या. 1951 मध्ये त्यांनी राष्ट्र सेवा दलातून क्रियाशील कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनाला सुरूवात केली. १९५७ साली त्यांनी सांगली जिल्ह्यात लोकल बोर्डाची निवडणूक त्यांनी लढवून जिंकली. त्यानंतर १९६४ मध्ये त्या सांगली जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या.
१९८० मध्ये त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. सांगली विधानसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती.
१९८० ते १०९८१ या कालावधीत मुख्यमंत्री बी.आर. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात महसूल व पुनर्वसन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर १९८२ ते १९८३ या दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री होत्या. १९८३ मध्ये त्यांनी वसंतदादा पाटील यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिला . १९८३ साली सांगली लोकसभा मतदारसंघातून पोटनिवणूक लढवून जिंकली. प्रदीर्घ काळ त्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होत्या.
काँग्रेसला सोडचिछठ्ठीत देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी क्रांती सेना नावाचा पक्ष काढला होता. आर्थिक निकषावर मराठा आरक्षण देण्याच्या मुद्दयावर त्या आग्रही होत्या. राजकीय, सामाजिक विधाने करून त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. परंतु आपल्या विधानावरून कधीही माघार घेतली नाही.