

Security Guard Died Chembur Mumbai
मुंबई : चेंबूर परिसरात एका दुर्दैवी अपघातात सिक्युरिटी गार्डचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३) सकाळी घडली. सुभाष नगर येथील बिल्डिंग क्रमांक १० मध्ये वैभव लक्ष्मी डेव्हलपर्सच्या मार्फत पुनर्विकासाचे काम सुरू असताना हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, नथुराम साखविलकर (वय ५२, रा. घाटला, चेंबूर) हे इमारतीत सिक्युरिटी गार्ड म्हणून ड्युटीवर होते. त्यांच्या कामाचा हा पहिलाच दिवस होता. सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास ते इमारतीतील एलिव्हेटर पार्किंग सिस्टीमची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी पार्किंगच्या पाचव्या मजल्यावरील प्लॅटफॉर्मवरून त्यांचा तोल जाऊन ते थेट तळमजल्यावरील मोकळ्या जागेत कोसळले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने साखविलकर यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.