

स्वप्निल कुलकर्णी
मुंबई ः जानेवारीत सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. संमेलनाची कार्यक्रम पत्रिकादेखील जाहीर झाली आहे. या कार्यक्रमांमध्ये साहित्य, संस्कृती आणि सहभागी होणारे वक्ते यांचा सुरेख संगम साधला आहे. 1993 साली साताऱ्यात झालेले संमेलन अशाच प्रयोगांनी संस्मरणीय ठरले होते. नाट्य संमेलनाच्या कर्जाचा भार असतानाही तत्कालीन आमदार छत्रपती अभयसिंहराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संमेलनाचे शिवधनुष्य लीलया पेलले.
32 वर्षांपूर्वी म्हणजेच 1993 साली साताऱ्यात मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावेळी विद्याधर गोखले हे संमेलानाध्यक्ष होते तर स्वागताध्यक्ष तत्कालीन आमदार अभयसिंहराजे भोसले (भाऊसाहेब) होते. साताऱ्यात संमेलन व्हावे यासाठी शिरीष चिटणीस यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी सातारचे नगरसेवक असलेले चिटणीस कार्यकर्त्यांसह भाऊसाहेबांकडे गेले. त्यांनी साताऱ्यात संमेलन घ्यावे, अशी भाऊंना विनंती केली मात्र त्याआधी नाट्यसंमेलन घेतले होते आणि ते नाट्यसंमेलन तोट्यात गेल्याने संमेलनाचे कर्ज फेडणे सुरू होते. त्यामुळे आपल्याला साहित्य संमेलन परवडणार नाही, असा भाऊसाहेबांचा विचार होता परंतु शिरीष चिटणीस यांनी आपण अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या वतीने संमेलनाची मागणी करू, मागणी केल्यानंतर संमेलनाचे आयोजन करण्याची संधी मिळण्यास किमान सात-आठ वर्षे लागतात. लवकर संधी मिळत नाही. आपण त्या प्रोसेसमध्ये राहू, असे सांगितले. त्यानुसार भाऊसाहेबांनी साताऱ्यात संमेलन मिळावे या मागणीच्या निवेदनावर सही केली. चिटणीस यांनी या निवेदनावर समीक्षक शंकर सारडा यांची सही घेतली आणि ते महामंडळाकडे पाठवले.
त्यावर्षी संमेलनासाठी एकही निमंत्रण न आल्याने अजिंक्यताराचा प्रस्ताव स्वीकारूया, असे माधव गडकरी यांनी महामंडळच्या बैठकीत सांगितले आणि अचानक बातमी आली की, ‘साहित्य संमेलन साताऱ्यात होणार’. नाट्यसंमेलनाचे कर्ज फिटले नसल्याने आता या साहित्य संमेलनाची तयारी कशी करायची, असा प्रश्न उभा राहिला. संमेलनाच्या आयोजनाचा मान साताऱ्याला मिळाल्यानंतर खर्चाचे नियोजन कसे करायचे, यावर विचार होऊ लागला. सगळे कार्यकर्ते एकत्र आले.
त्यावेळी ग. ना. जोगळेकर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते. बातमी आल्यानंतर त्यांनी ‘हा निर्णय महामंडळाच्या बैठकीत झाला त्याला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते मात्र अध्यक्ष नात्याने मी उपस्थित नव्हतो. त्यामुळे मला हे मंजूर नाही. साहित्य संमेलनासाठी इतर ठिकाणाहून निमंत्रणे आली आहेत. आपण त्याचा विचार करू,’ अशी भूमिका घेतली. त्यावर सुरेश द्वादशीवार त्यांना म्हणाले, ‘साताऱ्यात संमेलन होतंय म्हणून नाही तर भाऊसाहेब हे भोसले असल्याने, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याने जोगळेकरांसारख्या एका ब्राह्मणाला साताऱ्यात संमेलन होऊ द्यायचे नाही,’ असे सांगण्याची भूमिका घेतली. त्यानंतर मात्र जोगळेकर यांनी माघार घेतली आणि साताऱ्यातील संमेलनाचा मार्ग मोकळा झाला.
साहित्य संमेलनासाठी झटले हजारो कार्यकर्ते
साताऱ्यात झालेल्या संमेलनासाठी तत्कालीन नेते आमदार अभयसिंहराजे भोसले आणि त्यांचे कार्यकर्ते झटत होते. आधीच नाट्य संमेलनाच्या कर्जचा भार असल्याने आणखी खर्च नको म्हणून हे कार्यकर्ते आणि स्वतः अभयसिंहराजे संमेलनात घरून जेवणाचा डबा घेऊन येत असत. संमेलन स्थळी फक्त निमंत्रितांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती, अशी आठवण शिरीष चिटणीस सांगतात.
असे झाले संमेलनाचे नियोजन
साहित्य संमेलन करायचे म्हटल्यावर पैसे आणणार कुठून हा सर्वात मोठा प्रश्न होता. अभयसिंहराजेंनी लोकांना आवाहन केले की, तुम्ही सगळ्यांनी साहित्य संमेलनासाठी साताऱ्यात येणाऱ्या लेखकांची आपल्या घरात निवासाची व्यवस्था करा. त्यावेळी संमेलनातील निमंत्रित लेखक, कवी, कवयित्री यांची निवासाची चांगली व्यवस्था करण्यात आली. त्यावेळी वेगवेगळे प्रयोग केले. रोज सकाळी या निमंत्रित लेखक, कवींचे स्थानिक वृत्तपत्र आणि गुलाबपुष्प तर कवियत्रींसाठी वृत्तपत्र आणि गजरा देऊन स्वागत करण्यात येई. त्यामुळे लेखक मंडळीही खूश होती.
नियोजन समितीच्यावतीने आवाहन
1993 च्या साहित्य संमेलनावेळी सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संमेलनाला आलेल्या साहित्यिक रसिकांची निवासाची व्यवस्था केली होती. त्याच धर्तीवर सातारा येथे होणाऱ्या 99 व्या मराठी साहित्य संमेलनाकरीता परगावाहून येणारे लेखक, रसिक यांच्या निवासाची, अंथरुण पांघरुण तसेच स्नानाची व्यवस्था विनामुल्य पध्दतीने करण्यासाठी संमेलन नियोजन समितीच्यावतीने सातारकरांना आवाहन करण्यात आले असल्याची माहिती 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी दिली.