

मुंबई : दरवर्षी ठराविक नावांनाच संमेलनाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळते. यामुळे नवीन चेहरे समोर येऊ शकत नाहीत. संमेलनाच्या निमित्ताने नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी, यासाठी सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये दरवर्षी सातत्याने दिसणाऱ्या कलाकारांच्या नावावर यंदा फुली मारण्यात येणार असून त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा क्रांतिकारी निर्णय यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे.
पुढील वर्षी 1,2, 3 आणि 4 जानेवारी दरम्यान सातारा येथे 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. गेल्या काही वर्षांपासून संमेलनाची कार्यक्रमपत्रिका पाहिली तर संमेलनामध्ये एक प्रकारचा तोच तोपणा आल्याचे पाहायला मिळत असे. अनेकदा परिसंवाद, कविसंमेलने आदी कार्यक्रमात तीच ती नावे पहायला मिळायची. मात्र यावर्षी ही परंपरा खंडित होणार आहे. येत्या साहित्य संमेलनातील कविकट्टा आणि गझलकट्टा तसेच परिसंवादामध्ये अनेक युवा साहित्यिकांचा, वक्त्यांचा समावेश झाल्याचे आशावादी चित्र पाहायला मिळणार आहे.
याबद्दल बोलताना अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले की, 'जुन्यांचा आदर आणि नव्याचा स्वीकार' हेच आजच्या गतिमान जगातले एक महत्त्वाचे सूत्र आहे. ते स्वीकारण्याचा एक भाग म्हणून साहित्य प्रवाहात तरुणांचा, नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यासाठी काही नवे मार्ग चोखाळावे लागतील. त्यासाठी आजची तरुण पिढी काय बोलत आहे, त्यांचा विचार काय आहे, याचा कानोसा घेणे महत्त्वाचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून साताऱ्यातील साहित्य संमेलनात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे आम्ही ठरवले आहे.
मागील तीन वर्षातील संमेलनात सहभागी झालेले कवी तसेच वक्त्यांची नावे यंदा दिसणार नाहीत, अशी भूमिका अखिल भारतीय मराठी महामंडळाने घेतली आहे. साहित्य संस्थांना गेल्या तीन वर्षातील कार्यक्रम पत्रिका पाठवून ही नावे परत नकोत, असे आवाहनही करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचा व्यासपीठ असं आहे की, एकदा येथे येऊन गेले की पुन्हा तिथे सतत आलं पाहिजे, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. ज्येष्ठांनीही नवीन लोकांसाठी जागा रिकाम्या करायला हव्यात. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनात नवीन चेहरे दिसतील, असेही अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.