

Sanjay Shirsat on Aditya Thackeray Maharashtra politics News
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पोरानं चांगले राहावं, चांगलं वागावं, लवकर लग्न करावं, वडिलांनासुद्धा त्रास होता कामा नये, याची काळजी घ्यावी, भविष्यात चांगला मोठा नेता व्हावा, या मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, शिवसनेतील उठावानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना अंगावर घेण्याचे काम केले होते. मला माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याबद्दल बोलायचं नाही, त्यांचे बोलवता धनी कोण आहे, याची माहिती मला आहे. थोडा वेळ द्या, पूर्ण ताकदीनिशी मी बोलेल.
अहमदाबाद येथील विमान दुर्घटना मन हेलावणारी होती. या दुर्घटनेत अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चूक कशी झाली, कोणामुळे झाली याची चौकशी होईल, भविष्यात अशा गोष्टी टाळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
लाडक्या बहिणींसाठी माझ्या खात्याचा निधी वळवला जातो, असा आरोप केला जात आहे. पण यात तथ्य नाही. कारण मला पण निधी दिला जात आहे, माझी नाराजी नाही, माझी अर्थमंत्री अजित पवार यांची भेट झाली आहे. त्यामुळे मी नाराज असण्याचे कोणतेही कारण नाही.
राज आणि उद्धव ठाकरे यांचे कुटुंब एकत्र यावे, यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. यात काही राजकीय चर्चा झाल्या आहेत का ? हे मला माहीत नाही. पण अशा भेटी होत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी होतात. उद्धव ठाकरे यांनी मला बोलावले तर भेटायला जाईल, यात परत तुम्ही राजकीय चर्चा करू नका, अशी खोचक टिप्पणी शिरसाठ यांनी केली.