

Sanjay Raut on Devendra Fadnavis : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली आवडत नसली, तरी राष्ट्र त्यांना साद घालत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ उत्तम बनवायचे असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फडणवीस यांना सांगितले आहे. घर बदलायचे म्हटले की आवराआवर करावीच लागते. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात राहण्याची कितीही इच्छा असली, तरी त्यांच्या बाजूची लोकच देव पाण्यात घालून बसली आहेत. ते 'मी इथेच राहणार' असे म्हणतात, याचा अर्थच असा की ते इथे राहणार नाहीत; दिल्लीला त्यांची गरज आहे," अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असे भाकीत आज (दि.१८) माध्यमांशी बोलताना केले.
देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील काही नेते सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत आहेत. "फडणवीस पूर्वी म्हणाले होते की 'मी पुन्हा येईन', पण तेव्हा ते आले नाहीत. अखेर पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यांना शिवसेना फोडावी लागली, राज्यपाल मॅनेज करावे लागले आणि नाईलाजाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे लागले," असेही राऊत म्हणाले.
"एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या पद्धतीने चाचपणी केली होती. ते दिल्लीत गुपचूप बैठका घेत असत. त्यांना केवळ सत्तेत जायचे होते म्हणूनच ते भाजपसोबत गेले. त्यांचा दिल्लीतील हा सर्व प्रवास रात्रीच्या वेळी असायचा आणि या सर्व हालचालींची माहिती आम्हाला वेळोवेळी मिळत होती," असा दावाही त्यांनी केला.
"धर्मेंद्र प्रधान हे आपल्या शिक्षण खात्यात उत्तम कामगिरी करू शकले नाहीत, म्हणूनच दबावाखाली त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. आता पुन्हा जर त्यांना खाते द्यायचे असेल, तर केंद्राला देशातील तरुणांचा विचार करावा लागेल. अन्यथा, केंद्र सरकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम करेल," असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर बोलताना राऊत यांनी माहिती दिली की, "आज ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आपला युक्तिवाद संपवतील. यानंतर फुटीर गट (शिंदे गट) चार ते पाच वेळा आपला युक्तिवाद करेल. या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेला साधारण दीड महिन्याचा कालावधी लागेल."
. "नाशिकच्या रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई सरकारी तिजोरीतून देण्यात यावी. मुख्यमंत्र्यांनी केवळ दोन गाड्या घेऊन नाशिकचे महापौर व उपमहापौरांना सोबत घेऊन तिथे जावे. या निष्काळजीपणासाठी नाशिकचे महापौर आणि महापालिका आयुक्तांवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे," असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला.