Anti Terror Operation : घातपाती हल्ल्यांचे मनसुबे उधळले! ISI ने पोसलेला ‘शाहजाद भट्टी’ दहशतवादी गट उद्ध्वस्त

स्वातंत्र्यदिनापूर्वी देशभरातील १४ राज्‍यांमध्‍ये २०० हून अधिक हस्तकांवर धडक कारवाई
Anti Terror Operation
प्रातिनिधिक छायाचित्र.Pudhari
Published on
Updated on

Anti Terror Operation : स्वातंत्र्यदिनापूर्वी केंद्रीय सुरक्षा दलांनी मोहीम राबवून पाकिस्तानच्या ISI च्या फूस असलेल्या ‘शाहजाद भट्टी नेटवर्क’ या दहशतवादी गटाला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. याद्वारे देशविरोधी आणि घातपाती हल्ल्यांचा मोठा कट उधळण्यात यश आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिली. देशभरातील १४ राज्यांमध्ये राबवलेल्या समन्वित मोहिमेद्वारे या नेटवर्कच्या २०० हून अधिक हस्तकांना अटक करण्यात आल्‍याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

दहशतवादाविरोधात भारताच्या ‘झिरो टॉलरन्स’

गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्‍स’ वर माहिती देताना सांगितले की, “मोदी सरकारने स्वातंत्र्यदिनापूर्वी ISI-चे पाठबळ असणार ‘शाहजाद भट्टी नेटवर्क’चा पराभव करत त्यांचे घातपाती हल्ल्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. वेगवेगळ्या १४ राज्यांमध्ये राबवलेल्या विशेष मोहिमांमुळे २०० हून अधिक जणांना बेड्या ठोकल्या आहेत.” दहशतवादाविरोधात भारताच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

Anti Terror Operation
Dimagi Naxal Party : 'CJP'नंतर आता 'दिमागी नक्षल पार्टी'ची हवा! २४ तासांत १.६ लाख फॉलोअर्स; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

मोठ्या प्रमाणावर शस्‍त्रसाठा जप्‍त

या दहशतवादी गटाकडून आयईडी (IED) स्फोटके, 'पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरी'चे शिक्के असलेले ग्रॅनेड, पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि हेरगिरीसाठी वापरले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे जप्त करण्यात आले आहेत. हे नेटवर्क भारतातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये थेट सहभागी होते.

१४ राज्यांत मोठी कारवाई: २५३ ताब्यात, ८० हून अधिक गुन्हे दाखल

केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सीमेपलिकडून चालणाऱ्या दहशतवादाविरोधातील कारवाईअंतर्गत १४ राज्यांमध्ये २५३ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत ८० हून अधिक एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले असून २०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

Anti Terror Operation
Shehzad Poonawalla : "लाडक्या पक्षाला भावूक निरोप.."; शेहजाद पूनावालांनी दिला भाजपच्‍या सर्व पदांचा पुन्‍हा एकदा राजीनामा

पाकिस्तानात स्थित ‘शाहजाद भट्टी नेटवर्क’

‘शाहजाद भट्टी नेटवर्क’ (SBN) ही पाकिस्तानात स्थित गुप्‍तचर संघटना ISI च्या पाठबळावर चालणारी एक दहशतवादी संघटना आहे. भारतभरात ग्रेनेड-पेट्रोल बॉम्बने हल्ले करणे, आयईडी स्फोट घडवणे आणि लक्ष्यित हत्या (टार्गेट किलिंग) करणे यात ही संस्था सक्रिय होती. हे नेटवर्क स्थानिक हस्तकांना पैसे देऊन पोलीस ठाणे, संरक्षण संस्था आणि धार्मिक स्थळांची रेकी करायचे तसेच हेरगिरीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यायचे, असेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले.

पोलिसांसोबत रिअल-टाइम इंटेलिजन्स शेअरिंग

१२ ऑगस्ट रोजी राज्य पोलिसांसोबत रिअल-टाइम इंटेलिजन्स शेअरिंग (तत्काळ माहितीची देवाणघेवाण) प्रणालीचा वापर करून ही भव्य मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत उत्तर प्रदेशातून ६२, हरियाणामधून ५२, दिल्लीतून ५१, पंजाबमधून ४४, राजस्थानमधून १५, महाराष्ट्रातून ८, उत्तराखंडमधून ५, कर्नाटक, गुजरात व बिहारमधून प्रत्येकी ३ आणि तेलंगणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व केरळमधून प्रत्येकी २ जणांना ताब्यात घेण्यात आले.

Anti Terror Operation
E10 Petrol : "जुन्या गाड्यांसाठी E10 पेट्रोल पुन्हा सुरू करा"; इंधनातील इथेनॉलवर मुख्य आर्थिक सल्लागार नेमकं काय म्हणाले?

पाकिस्तानी नागरिकासह उत्तर प्रदेशातील तरुणाला अटक

या कारवाईदरम्यान, पश्चिम बंगालच्या एसटीएफने (STF) भारत-बांगलादेश सीमेजवळून एका संशयित पाकिस्तानी नागरिकाला आणि एका उत्तर प्रदेशातील रहिवाशाला अटक केली.राणा रौफ उर्फ ​​वहाब आलम (रा. फैसालाबाद, पाकिस्तान) याला उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हाब्रा येथून अटक करण्यात आली. त्याचे ISI शी संबंध असल्याचा संशय असून भारतातील त्याच्या हालचालींचा तपास सुरू आहे. तर कोलकाता येथून अटकेत असलेला दुसरा आरोपी मोहम्मद एजाज हा रौफच्या थेट संपर्कात होता. व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामद्वारे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या उत्तर प्रदेशातील २३ वर्षीय तरुणाला कर्नाटकातील कलबुर्गी येथून अटक करण्यात आली. याशिवाय, पश्चिम बंगाल एसटीएफने कूचबिहार जिल्ह्यातून ISI साठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून अन्य तीन जणांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news