पुढारी ऑनलाईन डेस्क
अब्रूनुकसानीच्या (defamation case) खटल्यात दोषी ठरवल्यानंतर काही तासांतच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात सुनावलेल्या शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती दिली आहे. तसेच त्यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या (Dr. Medha Kirit Somaiya) यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत यांना माझगाव न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) न्यायालयाने आज गुरुवारी दोषी ठरविले होते. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना १५ दिवसांचा कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) आरती कुलकर्णी यांनी राऊत यांना भारतीय दंड संहिता कलम ५०० (अब्रूनुकसानी प्रकरणी शिक्षा) अंतर्गत दोषी ठरवले. या प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना लगेच १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राऊत यांच्या वकिलाने शिक्षेला स्थगिती आणि जामीन मिळण्यासाठी दोन याचिका दाखल केल्या. ज्याला न्यायालयाने परवानगी दिली.
''आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. पण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही; तोपर्यंत आम्ही लढत राहू. आम्ही वरच्या न्यायालयात जाऊ. १५ वर्ष शिक्षा ठोठावली तरी मी बोलणे थांबणार नाही.'' असे राऊत यांनी म्हटले आहे.
मिरा भाईंदर शहरात १५४ पैकी १६ सार्वजनिक शौचालये बांधण्याचे कंत्राट भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्रे सादर करुन, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यामुळे बदनामी झाली, असा दावा करत मेधा सोमय्या यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर माझगाव न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) यांनी संजय राऊत यांना दोषी ठरवले.