पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या (Dr. Medha Kirit Somaiya) यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना १५ दिवसांचा कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. यावर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
''आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. पण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही; तोपर्यंत आम्ही लढत राहू. आम्ही वरच्या न्यायालयात जाऊ. मी जनतेच्या हिताचा मुद्दा मांडला. तो भाजपला झोंबला. आमच्याकडे कागद आहे; ज्याच्यावर आम्ही बोललो. म्हणून मला अब्रुनुकसानी प्रकरणी दोषी ठरवले. विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. यामुळे संजय राऊतांना फासावर लटकवताय का?.'' असा सवाल राऊतांनी केला.
१५ वर्ष शिक्षा ठोठावली तरी मी बोलणे थांबणार नाही, असे आव्हानही राऊत यांनी दिले आहे. अगोदर माई भाईंडदरच्या विरोधी पक्षनेत्याने शौचालयाच्या बांधकामावरुन आरोप केला होता. प्रताप सरनाईक यांनीही या घोटाळ्याबाबत राज्य सरकारला पत्र लिहिले होते. विधानसभेत याबाबत प्रश्नही विचारले गेले. यासंदर्भात कायदेशीर चौकशी करावी, असेही सांगण्यात आले होते. सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाचा अपहार होतोय, असे मी म्हटले होते. मी केवळ सवाल केला होता की त्यात काही भ्रष्टाचार आहे का?. या प्रकरणी आमच्याकडे पुरावे असून आम्ही आम्ही सत्र न्यायालयात जाऊ, असे राऊत यांनी म्हटले आहे.
मिरा भाईंदर शहरात १५४ पैकी १६ सार्वजनिक शौचालये बांधण्याचे कंत्राट भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्रे सादर करुन, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यामुळे बदनामी झाली, असा दावा करत मेधा सोमय्या यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर महानगर दंडाधिकारी माझगाव यांनी संजय राऊत यांना दोषी ठरवले आहे.