

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूड यांच्यातील स्क्रीन वाटपाचा जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'येरे येरे पैसा ३' या मराठी चित्रपटाला काही चित्रपटगृहांमधून काढून त्याजागी 'सैयारा' या हिंदी चित्रपटाला स्थान देण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली असून, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही 'मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत' असे सूचक विधान करत या वादात उडी घेतली आहे.
मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "मराठी साठी सगळे एकत्र येत आहेत, लढत आहेत, तरीही प्रश्न काही संपत नाहीत. सैयारा या हिंदी चित्रपटास थिएटर मिळावे म्हणून 'येरे येरे पैसा ३' या मराठी चित्रपटास उतरवण्यात आले. हे नेहमीचेच झाले आहे. मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल. मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत," असे खासदार राऊत यांनी म्हटले आहे.
'येरे येरे पैसा ३' चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच, अचानक काही मल्टिप्लेक्समध्ये या सिनेमाचे शो कमी करण्यात आले. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील असंतोष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या प्रकरणावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मल्टिप्लेक्स मालकांना इशारा दिला आहे. "येरे येरे पैसा ३ च्या स्क्रीन कमी करण्यामागे केवळ सुडाचे राजकारण आहे. मराठी सिनेमाच्या स्क्रीन्स कमी करू नका, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने लावू," असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.