

मुंबई: उद्योगपतीच्या घराबाहेरील अँटेलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला दिलेला जामीन रद्द करण्यात यावा, अशी जोरदार मागणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज मुंबई उच्च न्यायालयात केली.
सचिन वाझेला जामीन देणे हे संपूर्ण समाजासाठी अत्यंत घातक ठरेल, असा दावा एनआयएच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयात केला.दरम्यान, उच्च न्यायालयाने विशेष एनआयए कोर्टाने वाझेला दिलेल्या जामिनावरील स्थगिती तूर्तास कायम ठेवली आहे.
मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश चकोर एस. बाविस्कर यांनी वाझेला मंजूर केलेल्या जामिनाविरोधात राष्ट्रीय तपासयंत्रणेने (एनआयए ) उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी एनआयएच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी वाझेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. वाझेने अतिशय थंड डोक्याने हे दहशतवादी कृत्य केले असून, हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून आपला साथीदार मनसुख हिरेनची हत्या घडवून आणल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
वाझेने स्फोटकांनी भरलेली कार एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या घराबाहेर भरवस्तीच्या परिसरात पार्क केली होती. तसेच एका आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटाच्या आडून धमकी देणारे पत्रही त्या कारमध्ये ठेवले होते. यावरून केवळ अंबानी कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण समाजात दहशत माजवण्याचाच वाझेचा मुख्य हेतू होता, असा दावा केला.
तसेच मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख म्हणून काम करत असताना वाझेने आपल्या पदाचा या कटात गैरफायदा घेतल्याचा आरोप एनआयएने केला. हा संपूर्ण प्रकार बाहेर येऊ नये यासाठी वाझेने मनसुख हिरेनवर सर्व आरोप स्वतःवर घेण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र, हिरेनने त्यास नकार दिल्याने वाझेने इतरांच्या मदतीने हिरेनची हत्या घडवून आणली, असे अनिल सिंह यांनी न्यायालयाला सांगितले.
तसेच विशेष एनआयए न्यायालयाने जामीन मंजूर करताना नोंदवलेल्या निरीक्षणांवरही तीव्र आक्षेप घेतला. आरोपनिश्चितीची प्रक्रिया पूर्ण होऊन खटला सुरू होत असतानाच आरोपीला जामीन देणे चुकीचे असल्याचे सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी स्पष्ट केले. पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.