

मुंबई : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यात राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या 1 लाख 5 हजार 811 विद्यार्थ्यांपैकी केवळ 72 हजार 284 बालकांचे प्रवेश निश्चित केले आहेत.अजूनही तब्बल 33 हजारांहून अधिक बालक प्रवेशापासून दूर आहेत. यासाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ 8 मे पर्यंत देण्यात आली आहे.
राज्यात एकूण 1 लाख 14 हजार 826 आरटीई जागांसाठी 2 लाख 89 हजार 286 अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून 1 लाख 5 हजार 811 विद्यार्थ्यांची निवड झाली; मात्र अंतिम टप्प्यात मोठ्या प्रमाणात पालकांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही परिणामी सुमारे 30 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी प्रवेशाबाहेर राहिले आहेत.
मुंबईत 4 हजार 941 निवडीतून 1 हजार 647 बालकांचे प्रवेश झालेले नाहीत तर ठाण्यात 10 हजार 578 निवड झाली असतानाही 3 हजार 446 विद्यार्थी अजूनही प्रवेशाबाहेर आहेत. रायगडमध्ये 4 हजार 345 पैकी 1 हजार 364 आणि पालघरमध्ये 3 हजार 183 पैकी 767 बालकांनी प्रवेश घेतलेला नाही.
पुण्यात 17 हजार 728 निवडीतून 12 हजार 502 प्रवेश झाले, नागपुरात 6 हजार 992 पैकी 4 हजार 244, तर ठाण्यात 10 हजार 578 पैकी 7 हजार 132 आणि मुंबईत 4 हजार 941 निवडीतून केवळ 3 हजार 294 प्रवेश झाले. ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्याने ही प्रक्रिया अपेक्षित यश मिळवू शकली नसल्याचे चित्र आहे.
पालकांकडून कागदपत्रांची पूर्तता वेळेत न होणे, अलॉटमेंट लेटर काढण्यात आलेल्या अडचणी, तसेच पडताळणी प्रक्रियेत झालेला विलंब ही प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. यामुळे आणखी मुदतवाढ देण्यात येत आहे.